आकोट – संजय आठवले
नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे सिद्ध झाल्याने आकोट न्यायालयाने संजय शंकर खंडारे वय ४८ वर्षे रा. खंडाळा ता. तेल्हारा ह्यास विविध कलमांतर्गत ६ वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा दंड न भरल्यास १२ महिने अधिकचा कारावास आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यान्वये ६ वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा दंड न भरल्यास १२ महिन्यांच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्रित रित्या भोगावयाच्या आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात हकिगत अशी आहे कि, पो.स्टे. हिवरखेड येथे दि. ०५.०२.२०२० रोजी फिर्यादी सुरेश किसनराव काटे रा. खंडाळा यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी स्वत: दि. ०५.०२.२०२० रोजी गावातील नारायण वर्मा यांचे संत्रा असलेल्या शेतात रखवाली करित असतांना दुपारी ०२.३० वा. चे सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी पीडिता वय ९ वर्ष, ही फिर्यादीसाठी शेतात चहा घेऊन आली होती. फिर्यादी चहा घेत असतांनाच व शेतात मुलीसोबत हजर असतांना संजय शंकर खंडारे हा त्यांचेजवळ आला. त्याने फिर्यादीशी गप्पा केल्या.
त्यानंतर फिर्यादीची अल्पवयीन मुलगी पीडिता ही घरी जात असतांना फिर्यादीला संजय खंडारे याने म्हटले कि, आज गावचा बाजार आहे. मी तुमच्या मुलीला गोड खाऊ घेऊन देतो. तेव्हा फिर्यादीने त्याला म्हटले कि, तिला गोड आवडत नाही. तु घेवून देवू नकोस. त्यानंतर फिर्यादीची मुलगी घरी जाण्यासाठी निघुन जात असतांना संजय खंडारे हा सुध्दा तिचे मागे निघून गेला. त्यानंतर लगेच अंदाजे ०३.०० वा. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी पीडिता ही रडत-रडत फिर्यादीजवळ शेतात आली. तिने सांगितले कि, मला संजय खंडारे हा त्याचे घरात घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हते.
मला हात धरून घरात नेल्यावर त्याने घरातील टि.व्ही. चा आवाज मोठा करून घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा आतून बंद केला. त्याने मला १० रूपये दिले आणि घरातील खाटेवर झोपवून माझे अंगावर झोपला. माझे मुके घेतले. त्यानंतर मला भीती वाटल्याने मी दरवाज्याचा कडी-कोंडा उघडून बाहेर पळून आली.
फिर्यादीच्या या जबानी फिर्यादवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. तपासून ती प्रकरण आकोट न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती प्रार्थना सहारे यांनी एकूण ७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या. तसेच हिवरखेड पोलीस स्टेशनचे पैरवी म्हणून पोहेकों विजय सोळंके ब.नं. २००२ व पी.सी. दिपक ढोले व.नं. १८५ हे होते. आरोपीला शिक्षेसंबंधी सुनावणी दरम्यान वि. न्यायालयात सरकारी वकील श्रीमती प्रार्थना सहारे यांनी युक्तीवाद केला कि, आरोपीचे वय ४८ वर्षापेक्षा जास्त आहे. त्याच्याविरुध्द अल्पवयीन ०९ वर्षीय बालीकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे गुन्हे सिध्द झाले आहेत.
पीडिता अतिशय अल्पवयीन आहे. अशा परिस्थितीत या आरोपीस दया बुध्दी दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. अशा विनंतीनंतर आणि दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. वरील प्रकरणात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील श्रीमती प्रार्थना सहारे यांनी मांडली. सरकारी वकील जी. एल. इंगोले आणि अजित वि. देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले.