नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गुंडरी,घुकसी,माहुली,चीचभवन,नयाकुंड,पटगोवारी,आमडी येथे अनेक महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या वाघाला अखेर वनविभागाने बेशुद्ध करून पकडले मात्र उपचारादरम्यान त्या वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
राजु कापसे
रामटेक
माहितीनुसार, परिसरातील गुंडरी,घुकसी,माहुली,चीचभवन,नयाकुंड,पटगोवारी, आमडी येथे गेल्या अनेक महिन्यापासून वाघाची धुमाकूळ होती. गावात येऊन जनावरांची शिकार वाघ करू लागला होता. यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी नयाकुंड परिसरात रस्ता रोको आंदोलन सुद्धा केले होते.
यावेळी वनविभागाने त्या वाघाचे बंदोबस्त लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
याच आधारे पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात रविवारी १२ मे ला सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास वनविभागाने वाघाला बंदिस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून जेरबंद करण्यात यश मिळविले, या वाघाची मागील काही महिन्यांपासून परिसरात दहशत होती. बंदिस्त करण्यात आलेला वाघ हा साडेतीन वर्षांचा असल्याची माहिती असून या वाघाला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये व्याघ्र संरक्षण कृती दलाच्या २० जवानांसह दीडशे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले.डॉट यशस्वीपणे लागल्यानंतर दोनशे मीटर अंतरावर जाऊन वाघ बेशुद्ध झाला.
रविवारी दुपारी ३.४५ वाजता वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले.त्यानंतर वाघाला गोरेवाडा नागपूर येथे उपचार केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली होती. मात्र गोरेवाडा उपचार केंद्रात सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास रेस्क्यू केलेल्या वाघाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित झाले असून या वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण..? असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.
वाघाला डॉट देऊन बेशुद्ध करून रेस्क्यू केल्यानंतर त्याला गोरेवाडा उपचार केंद्रात नेण्यात आले.तिथे घेऊन गेल्यानंतर वाघाची प्रकृती खालावली व यातच त्याचा मृत्यू झाला.मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सोमवारला शवविच्छेदन करण्यात येणार असले तरी या मृत्यूला जबाबदार कोण..? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. गरीब शेतकऱ्याच्या हाताने वाघाला दुखापत झाली तर शेतकऱ्याला दोषी करार करून शिक्षा दिली जाते.आता वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघाचा जीव गेला असून आता शिक्षा कुणाला होईल याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत..