“क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मार्केट यार्ड नामफलकाचे अनावरण.”
बकरा मंडी व भाजीपाला बाजार सुरू होणार…
विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.
रामटेक – राजू कापसे
आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवलापार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात भाजीपाला बाजार व बकरा मंडी सुरू करण्यात येत आहे.रामटेक येथील मुख्य बाजार आवारात विविध सुविधा उपलब्ध करून देताना देवलापार येथील उपबाजार आवारात भाजीपाला बाजार व बकरा मंडी सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने यापूर्वीच घेतला आहे.
हा बाजार सुरू करताना उपबाजार आवारात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीने येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकास कामे प्रस्तावित केली आहेत.देवलापार हा आदिवासी बहुल भाग आहे. या परीसरातील सुमारे 75 गावातील लोकांचा नियमित देवलापारशी संपर्क असल्याने तिथे त्यांचे साठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा मानस असल्याने या मार्केट यार्डला क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा ठराव बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला होता.
त्यानुसार येथील मार्केट यार्डच्या “क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मार्केट यार्ड” या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यासोबतच ताराचे कंपाऊंड लिलाव शेड, पिण्याचे शुद्ध पाणी, जनावरांसाठी पाण्याचे हौद,रॅम्प उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व प्रस्तावित कामांचे या बाजार आवारात सभापती सचिन किरपान, उपसभापती लक्ष्मी कुमरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
हा बाजार यशस्वी होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे व्यापारी -अडत्यांना अनुज्ञप्ती तातडीने देण्यात येतील असे यावेळी सभापती सचिन किरपान यांनी सांगितले. देवलापार व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन सभापती सचिन किरपान यांनी यावेळी केले.
शेतकरी हा आपल्या बाजार समितीचा श्वास आहे.आणी त्यांच्या सोयी-सुविधेसाठी संचालक मंडळ सतत प्रयत्न करणार असल्याचेही किरपान म्हणाले. भुमीपूजन कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक सर्वश्री त्रिलोक मेहर,नकुल बरबटे, भिमराव आंबिलडूके,
रामू झाडे,नरेश मोहने,विजय मदनकर,बाबूलाल वरखडे, योगेश म्हात्रे,उमेश भांडारकर, यशवंत भलावी,झनकलाल मरस्कोल्हे,श्रीमती साबेरा पठाण सचिव हनुमंता महाजन,लेखापाल निक्की महाजन व अन्य कर्मचारी उपस्थित होते.