- शासनाकडे पाठविला प्रस्ताव
- प्रस्ताव मंजुर झाल्यास रामटेक चा होणार कायापालट
रामटेक – राजु कापसे
भारतीय किंवा विदेशी उद्योगपतींनी रामटेक येथे यावं व येथील भौगोलीक परिस्थिती न्याहाळून येथे विविध उद्योग तथा प्रकल्प उभारावे जेणेकरून येथील जवळपास दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा आशयाचा प्रस्ताव तयार करून भाजपा नागपुर ग्रामीण चे उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी शासनाला पाठविला आहे व हे उद्योग तथा प्रकल्प उद्योगपतींनी रामटेक क्षेत्रात उभारावे यासाठी शासनाने त्यांना कन्व्हेंस करावे अशी मागणी राजेश ठाकरे यांनी शासनाने दिलेल्या प्रस्तावात केलेली आहे.
उद्योग तथा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील जमीन आम्ही उपलब्ध करून देवु असेही राजेश ठाकरे म्हणाले. त्यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार परीसरात अनेक पहाड्या तथा तलाव आहे. त्यांचा उपयोग विविध प्रकल्प उभारण्यास करता येवु शकतो. वनविभागानेसुद्धा जमीनीबाबद थोडं सहकार्य केले तर रामटेक कायाकल्प व्हायला वेळ लागणार नाही. राजेश ठाकरे यांनी एकुण आठ विकास प्रकल्प सांगितले आहे.
त्यानुसार पहिले रामटेक पारशिवनी टुरीझम हब, दुसरे रामटेक श्रीराम मंदीर रामायण सर्कीट मध्ये समाविष्ट करणे, तिसरे अंबाळा येथे तलाव सौंदर्यीकरणासह विविध सोयी सुवीधा करणे, चौथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एंटरटेनमेंट पार्क, पाचवे देवलापार कोलीतमारा भागातील आदिवासींसाठी जंगलावर आधारीत उद्योग प्रकल्प तथा आयटीआय, सहावे पारशिवणी येथील सर्व धार्मिक स्थळांचा विकास, सातवे शेती विकास प्रकल्प राबविणे व आठवे म्हणजे रेल्वे नेटवर्क पुर्णत्वास नेणे त्यात रामटेक – तुमसर – छत्तीसगड, रामटेक – पारशिवनी – मध्यप्रदेश, रामटेक – देवलापार – मध्यप्रदेश असे रेल्वेचे जाळे निर्माण करणे आदींचा समावेश आहे.
प्रस्तावाची दखल घेऊन शासनाने जर हालचाली केल्या व त्यानुसार उद्योगपतींनी येथे पैसा लावुन विविध प्रकल्प उभारली तर नक्कीच रामटेक क्षेत्राचा कायापालट होवुन तब्बल दहा हजार लोकांना येथे रोजगार मिळेल असा विश्वास डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रपरीषदेत व्यक्त केला.
पत्रपरिषदेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांचेसह विवेक तोतडे, नाना उराडे, आनंदराव चोपकर, नवरगाव ग्रा.पं. सरपंच ज्योती कैलास ठाकरे, बैजु खरे, कुंभलकर, बाळकृष्णा राजुरकर, कोमल भोयर आदी. उपस्थित होते.