- दोन ब्रास रेतीत शासनानेच बांधुन द्यावे घर
- घरकुल लाभार्थ्यांनी फोडला टाहो
रामटेक – राजु कापसे
स्वतःचे घर नसलेल्यांना शासन शबरी, रमाई घरकुल योजनेंतर्गत सहाय्य करते हे खरे असले तरी मात्र एक घर बांधण्यासाठी पाच ते सहा ब्रास रेती लागत असतांना त्यात अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी केवळ दोन ब्रास च रेती उपलब्ध करण्यात येत असल्याने घर बांधावे तरी कसे असा सवाल घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.
घरकुल धारकांना दोन ब्रास रेती वाटप सुरू आहे. पण दोन ब्रास रेती मध्ये चार कॉलम सुद्धा होत नाही. तेव्हा शासनाकडून घरकुल धारकांची थट्टा च आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही. माहिती नुसार एक घरकुल बांधण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा ब्रास रेती लागते तर बाकीची रेती आणायची कुठून हा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी निधी सुद्धा अपुरा पडत असतो व त्यातच दोन ब्रास रेतीचे प्रावधान. तेव्हा शासनाने यात बदल करावा किंवा दोन ब्रास रेतीमध्ये शासनानेच घर बांधुन द्यावे असा टाहो आता घरकुल लाभार्थ्यांनी फोडला आहे.
तालुक्याच्या विशेषतः आदिवासीबहुल भागात घरकुल बांधनीचे काम जोरावर सुरु आहे. अनेक लाभार्थी घरकुल योजनेंतर्गत घर बांधनीसाठी रेती च्या प्रतिक्षेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसुल विभागाकडून ६ मे पासुन रेतीची रॉयल्टी सुद्धा देणे सुरु करण्यात आलेले आहे.
मात्र दोन ब्रास रेतीचीच रॉयल्टी सध्या मिळत असल्याने घरकुल लाभार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे. महागाईच्या काळात बाकीची रेती आणावी तरी कुठून ? असा सवाल लाभार्थ्यांपुढे आ वासुन उभा ठाकला आहे.