सावनेर एस.डी.पी.ओं.च्या पथकाची कारवाई… रामटेक पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक -:तालुक्यातील आमगाव जवळील एका फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अनिल म्हस्के यांच्या विशेष पथकाने गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता ही कारवाई केली.
आमगाव येथील फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी म्हस्के यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून म्हस्के यांनी सावनेर, खापा व केळवद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले. आमगाव येथे पोहोचल्यावर पोलिस पथकाला पानठेलेजवळील फार्म हाऊसबाहेर दुचाकी व चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसले. पंचांच्या उपस्थितीत फार्म हाऊसवर सुनियोजित छापा टाकून 12 जण जुगार खेळताना पकडले. आरोपींकडून 3 लाख 62 हजार 300 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 77 हजार रुपये किमतीचे 15 स्मार्ट मोबाईल व 2 बेसिक फोन सापडले. तसेच कार व काही दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहे.
जप्त केलेल्या संपूर्ण मालाची किंमत 17 लाख 89 हजार 300 रुपये आहे. याप्रकरणी रामटेक पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्प संघटित गुन्हेगारी अंतर्गत BNS कलम 112 अन्वये देखील कारवाई प्रस्तावित केल्या गेली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक रमेश धुमाळ, एसडीपीओ अनिल म्हस्के, खापा चे ठाणेदार विशाल गिरी. सावनेर थाने चे पीएसआई बालू राठोड़, कांस्टेबल सतीश देवकते, किशोर राठोड़, रणधीर गेडाम, केळवद पो.स्टे. मधील हवालदार सुधीर यादगिरे यांनी ही कारवाई केली.
रामटेक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेश्याव्यवसाय, क्रिकेट सामन्यांवरील सट्टा, वाळू तस्करी यासह विविध अवैध धंदे चालत असल्याच्या चर्चा नागरीकांमध्ये आहे मात्र असे असतानाही रामटेक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष कसे ? तसेच ज्याअर्थी सावनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आमगाव येथील या जुगारड्याची माहिती पोहोचू शकते त्याअर्थी रामटेक पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती नसेल का ? हे प्रश्न भल्या भल्यांच्या भुवया उंचावणारे आहे. तेव्हा एकूणच रामटेक पोलिसांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.