राजु कापसे
रामटेक
प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा देशाच्या कानाकोपर्यापर्यंत प्रख्यात असलेल्या रामनगरी ( रामटेक ) मध्ये येत्या ३० मार्च ला गडमंदीरावर श्रीराम नवमी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रामनवमी च्या कार्यक्रमाचा जय्यत तयारी सुद्धा करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीपासुनच गडमंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गडमंदीर उंच असल्याकारणाने रात्रीच्या सुमारास जवळपास १५ किलोमिटरपासुनही हा रामगड दिसुन येत असतो हे विशेष. रामनवमी च्या दिवशी गडमंदीरावर विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पुजा अर्चना पार पडत असतात. दरम्यान या दिवशी दिवसभर गडमंदीरावर रामनामाचा जयघोष सुरु असतो. किर्तनकारांचे किर्तन सुरु असते. रामभाऊजी पडोळे यांचे ही किर्तन या दिवशी येथे होत असते.
यादिवशी मोठ्या संख्येने येथे दिंड्या येत असतात. दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथे दहीकाल्याचा कार्यक्रम होत असतो. यावेळी येथे हजारो भक्तगण उपस्थित असतात. लोकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे देवस्थानच्या रिसीव्हर एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आपल्या सुरक्षा रक्षकांसह तटस्थ असतात. यादिवशी दिवसभरच येथे हजारो भक्तगणांची रेलचेल सुरु असते. बाहेरगाववरून तथा दुरदुरुन मोठ्या संख्येने येथे भक्तगण येत असतात.