Wednesday, January 1, 2025
Homeराज्यरामटेक | निपुण भारत अभियान अंतर्गत निपुणोत्सव साजरा...

रामटेक | निपुण भारत अभियान अंतर्गत निपुणोत्सव साजरा…

रामटेक – राजु कापसे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता विकसन होण्यासाठी निपुण भारत अभियान सध्या भारतभर सुरू असून त्या अंतर्गत नुकताच “निपुणोत्सव” हा उपक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय भंडारबोडी येथे साजरा करण्यात आला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा निपुणोत्सव हा उपक्रम शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर आयोजन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी पासून दिनांक 23 मार्च पर्यंत एकूण सहा आठवड्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये पहिले दोन आठवडे शाळा स्तर, तिसरा आठवडा केंद्रस्तर, चौथा आठवडा तालुकास्तर, पाचवा आठवडा जिल्हास्तर व सहावा आठवडा राज्यस्तर अशा पद्धतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

शिवनी केंद्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळेतील शिक्षकांकरिता निपुणोत्सव भंडारबोडी येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये शिक्षक निर्मित साहित्याचे प्रदर्शन व सादरीकरण करण्यात आले.शाळा निपुण होण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या उत्तम कृती व तत्सम अनुभवांचे आदान प्रदान करण्यात आले. शिक्षकांना शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडचणींवर कशाप्रकारे मात करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वर्ग व शाळा निपुण करण्यासाठी आवश्यक आराखडा यावेळी तयार करण्यात आला.

निपुणोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शन कक्षाची फीत मा. सरपंच यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले.

प्रदर्शनीतील सर्व शैक्षणिक साहित्यांबाबत माहिती उपस्थित पाहुण्यांनी समजून घेतली व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकरिता प्रयत्नशील असल्याबाबत त्यांचे कौतुकही केले.. सदर प्रदर्शनी मध्ये शिवनी केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला असून 30 पेक्षा अधिक प्रतिकृती यावेळी ठेवण्यात आल्या होत्या.

या निपुणोत्सवाकरिता प्रामुख्याने गट ग्रामपंचायत भंडारबोडीच्या सरपंच मा. सुनीता मिसार, गटग्रामपंचायत सदस्य मा. राणीताई सहारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास ठाकरे, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य राजेंद्र बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर निपुणोत्सवाचे संयोजक केंद्रप्रमुख विकास गणवीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत या उपक्रमाची इतंभूत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रणित वाघ यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भारती बारापात्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर कोसरे,मनीषा राठोड, सुरेंद्र देशभ्रतार, रमेश परसगाये, नितेश जांभुळे, संगीता मसराम,

श्रावण टेकाडे, मीनाक्षी हुमणे, चित्रा उघडे, दीपा शेंडे, पंजाब राठोड, प्रमिला पुंड, रंजीता राठोड, सरोज बनसोडे, अनुसया नगरे, चंदू कामठे, गेंदलाल भारद्वाज, रामरतन पुडके, विनोद भगत,संजू शनिचरे, मेहर,पवार, तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

शिक्षकांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे असे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन पाहून आनंद वाटला. देशाचे भावी नागरिक घडवणारे शिक्षक आजही खूप तळमळीने विद्यार्थी विकासात हातभार लावत असल्याचे दिसून येत आहे. कितीही असैक्षणिक कामे असले तरीही गुणवत्ता ढासळून देण्याच्या त्यांचा ध्येय अभिमानास्पद आहे. – सुनीता मिसार सरपंच भंडारबोडी

अध्ययन अध्यापनाचे कार्य करत असतानाच शासनाने नेमून दिलेले विविध अभियान व उपक्रम पार पाडणे हे सर्व शिक्षकांचे कर्तव्यच आहे. शिक्षक विद्यार्थी हिताचे सर्व अभियान व उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात शंभर टक्के योगदान देतात. – विकास गणविर, केंद्रप्रमुख शिवनी

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: