Sunday, October 13, 2024
Homeकृषीरामटेक | खिंडसी बॅक वॉटर प्रकरणी सभापती सचिन किरपान यांचे नेतृत्वात शेकडो...

रामटेक | खिंडसी बॅक वॉटर प्रकरणी सभापती सचिन किरपान यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचे एस.डी.ओं. ना निवेदन…

रामटेक -: खिंडसी जलाशयाचे बॅक वॉटर हे सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी व समस्याचे केंद्रबिंदू ठरत आहे. या बॅक वॉटर खाली अनेक शेतकऱ्यांच्या शेती बुडून असून जनावरांचे कुरण तथा शेती संबंधित अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत तेव्हा खिंडसी जलाशयाची पाणी पातळी पाणी साठवणूक कमी करून ही समस्या त्वरित सोडवा या आशयाचे निवेदन घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी काल दिनांक १७ सप्टेंबरला शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय महसूल गाठले होते.

व एस.डी.ओ. ना निवेदन सोपवून त्वरीत समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा पावित्रा घेण्यात येईल असे ठणकावले.
दिलेल्या निवेदनानुसार खिंडसी जलाशयाच्या ‘बॅक वॉटर मध्ये होणाऱ्या वाढीमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान, वैरणाच्या समस्या, रस्त्यांची समस्या, मासेमारी करण्यात येणारी समस्या व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी येणारी अडचण अशा विविध समस्यांनी तोंड वर काढले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा पावसाळयात खिंडसी जलाशयाच्या बैंक वॉटरमध्ये होणाऱ्या वाढीमुळे जलाशयाच्या परिसरातील कवडक, मुसेवाडी, सोनपूर, पिंडकापार, मांगली, गुडेगांव, मांद्री, पंचाळा, लोहारा, घोटी इत्यादी १० ते १२ गावांच्या शिवारातील सुमारे २००० एकर शेतीत पाणी साचुन आहे. खोलगट भागातील शेतीत ८ ते १० फुट पाणी साचलेले आहे. शेतात जाण्यासाठी जाणाऱ्या स्स्त्यावर पाणी साचल्याने, शेतात मजुरांची ने आण करण्यासाठी तसेच खते व इतर साहित्य नेण्यासाठी बोटींचा वापर करावा लागतो. या सर्व संकटामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबियांसह, जनावरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. विद्युत ट्रांसफार्मर लागलेला परिसर सुध्दा पाण्यात बुडालेला असल्याने, शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी जिवाची बाजी लावुन बोटीचा वापर करावा लागतो.

त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. खिंडसीच्या बॅक वॉटर मुळे मुसेवाडी पर्यंतचा शिवार पाण्याखाली आलेला आहे. याच जलाशयावर शेकडो मासेमार बांधव मासेमारी करतात. जलाशयात पाणी जास्त असल्याने जाळे टाकल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नसल्याने त्यांना उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडलेला आहे. खिंडसी जलाशयाच्या परिसरात बैंक वॉटर साचुन राहत असल्याने तसेच पाणी वाहुन जाण्यास मार्ग नसल्याने संपुर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले आहे. ते कमी होण्याऐवजी त्यामध्ये सतत वाढ होत आहे. शेताकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली आलेले आहे. पाण्यामुळे बुडुन असलेल्या शेत शिवारातील चारा सडलेला असल्याने वैरणाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे वैरण टंचाईने गंभीर रूप धारण केलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विक्री केलेली आहे व उर्वरीत शेतकरीही आपली दुभती जनावरे विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील दुग्धव्यवसाय संकटात आलेला आहे. ही समस्या आगामी काळात अधिक बिकट होवु शकते. सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खिंडसी तलावाच्या लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता. कोणतेही जमिनीचे मोजमाप न करता शेतकन्यांच्या मालकीच्या जमिनीवर खिंडसी तलावाची सिमांकन कक्षा निश्चित करून मनमर्जीने दगड गाडलेले आहेत. याप्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. तसेच मागील तिन वर्षापासुन खिंडसी जलाशयातील शेती करण्यासाठी लिलावात घेतलेली जमीन पाण्याखाली बुडुन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडुन शासनाने जमा केलेली अंदाजे एक कोटी असलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना त्वरीत परत देण्यात यावी. खिंडसीच्या बैंक वॉटरमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दरवर्षी होत आहे. आपल्या जीवावर उदार होऊन पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपरोक्त सर्व समस्यांवर व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने गांभिर्यपुर्वक व कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जाबाबदार राहील अशी तंबी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांचेसह नकुल बरबटे व शेतकऱ्यांनी दिलेली आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: