रामटेक – राजु कापसे
आज सर्व सामान्य माणसा करिता रेल्वे हे प्रवासाचे सर्वात सुरक्षित आणि किफायतशीर साधन मानले जाते. एखाद्या गावासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असणे,प्रगतीचे अनेक मार्ग उघडवणारा विषय असतो. या उलट रेल्वेची सुविधा नसणे कित्येक अडचणींचे मूळ असते. सरकारच्या दृष्टीने रेल्वेचे जाळे लोकसेवा आणि उत्पन्न दोन्ही दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जाते.पण रेल्वे मार्गाची निर्मिती हा काही सहज सोपा विषय नाही. नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव, मंजुरी,सर्वेक्षण,भू संपादन त्यातील वाद ,प्रत्यक्ष कार्य,विद्युतीकरण ,ट्रायल आणि लोकार्पण अशी अनेक कामाची अडथळ्यांची शर्यत पुढे उभी राहते. यातील प्रत्येक टप्प्याला वर्षानुवर्षे कालावधी लागतो.
म्हणून जनप्रतिनिधी साठी नव्या लोहमार्गाच्या निर्मितीचे आश्वासन देणे सोपे आहे परंतु ते कृतीत उतरवणे महाकठीण असते. सर्व काही अनुकूल असूनही वेळ लागू शकतो. आपल्या विदर्भातील वर्धा नांदेड मार्गाची संसदे मध्ये घोषणा होवून वीस वर्षे उलटली तरी अजून काम पूर्ण झाले नाही यातूनच कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी योग्य तो बोध घेणे जरुरी आहे. पण यातही सर्वांच्या, विशेषतः रेल्वे विभागाच्या सोयीचा एक उपाय आहे. तो म्हणजे पूर्वीचं उपलब्ध असलेल्या रेल्वे मार्गांना जोडणे. मात्र हा मुद्दा समजून घेण्याकरिता थोडी कल्पकता आणि खूप मोठी संवेदनशीलता आमच्या नेत्यांच्या ठायी असणे आवश्यक आहे.
आता आपण पूर्व विदर्भात सहज शक्य असलेल्या एक लोक उपयोगी आणि कमी खर्चाच्या रेल्वे प्रकल्पाची चर्चा करू या. सर्वच रेलमर्ग नव्वद टक्के तयार आहे. ना सर्वेक्षणाची गरज,ना भूसंपादनाची कार्यवाही,ना विद्युतीकरण खर्च ! आणि तरी देखील तुमच्या हातून फार मोठी जनसेवा घडू शकते .पण त्या साठी तशी दृष्टी पाहिजे. बघा,रामटेक ते नागपूर रेल्वे मार्ग विद्युतकरणा सह उपलब्ध आहे. नागपूर ते वर्धा मार्ग तिसऱ्या ट्रॅक सह सुरू होत आहे.
वर्धा ते चंद्रपूर मार्ग सुरू आहे. चंद्रपूर ते गोंदिया या संपूर्ण आदिवासी टप्प्यातील रेल्वेमार्गावर सुद्धा गाड्या सुरू आहेत. गोंदिया ते खात हा मुंबई कोलकाता मार्गाचा एक लहानसा सेगमेंट आहे. आता फक्त खात ते रामटेक असा केवळ पंचवीस की. मी. लांबीचा मार्ग तयार केला तर सलग सहाशे पन्नास की.मी. लांबीचा लोहमार्ग साधल्या जातो. रामटेक – नागपूर – वर्धा – चंद्रपूर – मूल – सिंदेवाही – ब्रह्मपुरी – वडसा देवळगाव – गोंड उमरी – सौदड – गणखेरा – गोंदिया – खात आणि रामटेक असा चक्राकार मार्ग सहज पणे तयार होवू शकतो .खर तर तो तयारच आहे.
दोन चार महिन्यांच्या तयारीत या मार्गावर सलगपणे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा दोन्ही दिशेने गाड्या सुरू करता येतात. यात रेल्वेचा सुद्धा प्रचंड फायदा आहे. सध्या या संपूर्ण मार्गावर अठरा इंजिन्स आणि शंभरावर अधिक बोगीज कार्यरत आहेत. सर्व मार्ग जोडले तर सहा इंजिन्स आणि बेचाळीस डबे लागतील. केवढी मोठी बचत ! प्रवाशी भाडे आणि माल वाहतूकीचा लाभ वेगळाच! मग इतका सहज,साधा,अल्प खर्चाचा रेल्वे प्रकल्प का शक्य नाही.
कारणे दोनच, रेल्वे अधिकाऱ्यांना अक्कल नाही आणि नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. अरे ,तुम्ही मनात आणले तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या मार्गावर गाड्या धावू शकतात. पूर्व विदर्भातील लोकसभेचे सहाही मतदार संघ सहज पणाने रेल्वे मार्गाने जोडणे शक्य असतांनाही आम्ही ते करणार नसू ,तर आमच्या सारखे कपाळकरंटे आम्हीच!
बघू या ,कोण कोण या सहज साध्य रेल्वे मार्गाचे फार मोठे श्रेय घेऊ इच्छितो. शेवटी हा सहा खासदार आणि छत्तिस आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे! हैं हिम्मत!
प्रकाश ज कस्तुरे
शितल वाडी
रामटेक जिल्हा नागपूर
9423384487