प्रेरणा सुनील
ह्या वर्षी एप्रिलमध्ये मैत्रिणीबरोबर राजगृह बघण्याचा, अनुभवण्याचा योग आला. दादरला हिंदू कॉलनी मध्ये कोपऱ्यावर उभारलेली प्रशस्त इमारत! बाबासाहेबांना आलिशानपणा अंगवळणी नव्हताच हे त्यांच्या घराच्या साध्या ठेवणीतून आणखीनच जाणवतं.आतमध्ये कॅमेरा बंदी होती म्हणून फोटो नाहीये.
आतमधली वाईब शब्दांत सांगण्याच्या पलिकडली आहे. ती अनुभवावीच लागते. समोर व्हरांडा, डावीकडे बैठकीची खोली, तिथे दोन खुर्च्या टेबल एक पुस्तकाचं कपाट जश्याच तसं ठेवून आहे. समोरच्या खोलीत बाबासाहेबांच्या काठ्या, पेन, ते बसायचे ती खुर्ची, त्यांच्या आयुष्यातली रोजच्या वापरातली भांडी -वस्तू प्रदर्शनसादृश्य ठेवलेली आहे.रमाईच्या सानिध्यात पवित्र झालेली काही पितळी भांडी तर आपल्याशी हितगुज करतात. गोष्टी सांगतात सोसलेल्या तिच्या हातांच्या…! आत तत्कालीन स्वयंपाकघर आहे.
पण तिथल्या वस्तू जशाच्या तश्या ठेवलेल्या नाहीत. आत आणखी एक खोली आहे जिथे बाबासाहेबांच्या फोटोचं प्रदर्शन मांडलं आहे. फोटोतले बाबासाहेब पाहून अविचल कर्तृत्वाचा रुबाब आपल्या डोळ्यांत झळकतो. इतका प्रज्ञावान हिरा….मोठ्या पगाराची नोकरी करून ऐशारामात कौटुंबिक जीवन जगू शकला असता पण दशा झालेल्या समाजाला दिशा देण्याचं महान कार्य करायलाच हा हिरा जन्माला आला होता.
1956 साली दिल्ली वरून बाबासाहेबांचं शव आणून जिथे ठेवल्या गेलं होतं ती खोली तशीच आहे. त्या खोलीतून पाय निघत नाही अंतःकरण जड होतं. दैदिप्यमान ,तेजस्वी सूर्याची किरणं त्या वास्तूला स्पर्शून गेली.आत गेल्यावर आपलं मन त्या किरणांचे राहिलेले कण सावडून घेण्याचा प्रयत्न करत राहतं.
तिथं घेतल्या जाणाऱ्या श्वासाला क्रांतीचा गंध येतो. तिथल्या भिंती त्यागाच्या कथा सांगतात .मन शहारून जातं. जमिनीवर जरा निवांत बसावं वाटतं. जमिनीवरून हात फिरवावा वाटतो. तिथल्या धुळीलाही जतन करून ठेवावसा वाटतं. मन “बाबासाहेब बाबासाहेब” हाक देत राहतं…..
विनम्र अभिवादन!