Sunday, December 22, 2024
Homeराजकीयराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत २७ सप्टेंबरला अकोटात...काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत २७ सप्टेंबरला अकोटात…काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार…

सुधाकरराव गणगणे यांचा सत्कार सोहळा.

अकोट – संजय आठवले

राज्यातील माजी आमदार समन्वय समिती अध्यक्ष तथा ओबीसी संघर्ष समितीचे सरसेनापती माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवस निमित्ताने होणाऱ्या सोहळ्याकरिता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे दिनांक २७ सप्टेंबर रोजी आकोटात येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास राज्यातील अनेक आजी-माजी मंत्री तथा आमदारांची उपस्थिती राहणार आहे.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यातील माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस व सत्कार समारंभ येत्या मंगळवार दि. २७ सप्टेंबरला त्यांची कर्मभूमी आकोट येथे आयोजित करण्यात आला आहे.

दोनदा आकोट मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुधाकरराव गणगणे यांनी आकोट तेल्हारा तालुक्यात अनेक विकास कामे केली.त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असलेले वारी येथील धरण, पोपटखेड धरण, आकोट, तेल्हारा, हिवरखेड येथील बस स्थानके, आकोट येथील पानवेली संशोधन केंद्र, आयटीआय, दूरदर्शन केंद्र, ग्रामीण रुग्णालय, गांधी मैदान स्टेडियम, एसडीपीओ कार्यालय ह्या विकासात्मक बाबींचे सारे श्रेय सुधाकरराव गणगणे यांनाच जाते.

यासोबतच न्यायालयाने बंद केलेली ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा लागू करून देण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम सुधाकरराव गणगणे यांनीच केले आहे. ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून असंख्य ओबीसींना न्याय देण्याचे तथा माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून माजी आमदारांच्या समस्या सोडविण्याचे काम आजही सुधाकर गणगणे करीत आहेत. त्यांच्या या ऋणाची जाणीव ठेवून त्यांच्या चाहत्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षते खाली त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आकोट येथील बिलबिले मंगल कार्यालय, मंदिपेठ, आकोट येथे सकाळी ११ वा. संपन्न होणाऱ्या सदर कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आणि खासदार संजय धोत्रे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गणगणे यांनी आकोटच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचा याप्रसंगी सर्व पक्षीय आमदारांचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार समारंभाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, एडवोकेट यशोमती ताई ठाकूर, सुनील केदार, उल्हास दादा पवार, डॉ विश्वजीत कदम, आमदार प्रणिती ताई शिंदे, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, अमित झनक, बळवंत वानखडे, राजेश एकडे, हरीश पिंपळे, रणधीर सावरकर, नितीन देशमुख, डॉ रणजीत पाटील,

अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री सुनील देशमुख, अजहर हुसेन, रामदास बोडखे, दशरथ भांडे, गुलाबराव गावंडे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, अॅड. नातीकोद्दीन खतीब, गजानन दाळू गुरुजी, नारायणराव गव्हाणकर, तुकाराम बिडकर, गोपीकिशन बाजोरिया, बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, संजय गावंडे, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी,

वसंतराव खोटरे यांच्या सह संपूर्ण राज्यातून ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी संघर्ष समिती आणि सुधाकरराव गणगणे अमृत महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत केले.

या पत्र परिषदेला आयोजन समिती अध्यक्ष महादेवराव हूरपडे, महेश गणगणे, मनीष हिवराळे यांनी संबोधित केले. यावेळी गजानन गणगणे, सुरेश ढाकुलकर,प्राचार्य प्रकाश बोरकर, गजानन आसोलकर हे उपस्थित होते. पत्र परिषदेचे सूत्रसंचालन अरविंद लहाने यांनी तर आभार प्रदर्शन कपिल रावदेव यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: