15 जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे आवाहन…
अकोला – संतोषकुमार गवई
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
या योजनेत राज्यात ३४ हजार ६०० कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुसार, राज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२४ पर्यंत त्यांची आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
आतापर्यंत या योजनेतील १५ हजार २११ लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे, त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिन्याचे मानधन अदा करण्यात आले होते.
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही, लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मानधन मिळाल्यानंतर मोबाईलवर संदेशाच्या रूपाने वेळोवेळी देता येईल, मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही. मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांचीच जबाबदारी आहे, कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करू शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईल वरून किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडणे आवश्यक आहे.
आधार पडताळणी करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग हे या समितीचे सदस्य सचिव असल्याने; ग्रामपंचायत किवा पंचायत समितीस्तरावरूनही याबाबत आपणास माहिती मिळू शकेल. यापुढे, ज्या कलाकारांची आधार पडताळणी झालेली आहे अशा कलाकारांच्या खात्यात विहित वेळेत मानधन जमा करण्यात येईल.
ज्या कलाकारांची आधार पडताळणी प्रलंबित आहे, त्यांना मानधन जमा होण्यास विलंब लागू शकतो. आधार पडताळणी करण्याबाबत काही अडचणी आल्यास, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई तसेच पुणे/ नागपूर औरंगाबाद या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागासाठी विभागीय कार्यालय नागपूर येथे असून, सहायक संचालक संदीप शेंडे, मो.९४२१७८२८४८, प्रज्ञा पाटील, सहा. लेखा अधिकारी-८९२८१३०६२२ यांच्याशी संपर्क साधावा.