किरण बाथम,कोकण ब्युरो चीफ
मुरुड गारंबी जंगलात फणसवाडी नजीक अज्ञात महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. फणसवाडी गावातील मेंढपाळाच्या निर्दशनास ही बाब लक्षात येताच त्यांने तात्काळ पोलिस पाटील पांडुरंग दौलत पानगळे यांना माहिती दिली. पानगळे यांनी मुरुड पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर मुरुड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा खून करुन तिला जाळून टाकणार्या आरोपीस मुरुड पोलिसांनी अटक केली. मुरुड पोलीस ठाणे हद्दीत फणसवाडी गावाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला जंगल भागात एका महिलेचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळालेल्या स्थितीत सापडला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे घटनास्थळी पोहचून तातडीने तपासास सुरुवात केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडूनही तपास करण्यात आला. अधिक तपासाअंती मुरुड पोलिसांना मांडवा पोलीस हद्दीत एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता ती महिला हीच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मग वेळ न दवडता मांडवा येथील सचिन दिनेश थळे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्यानेच हे कृत्य केल्याचे कबूल केले. मांडवा येथेच राहणार्या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. आरोपीने मनात राग धरून तिला मुरुडला आणून जीवे ठार मारले. पुरावा नष्ठ करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मुरुड पोलिसांनी याप्रकरणी सचिन थळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे, एएसआय सचिन वाणी, सुरेश वाघमारे, सागर रोहेकर, विलास आंबेतकर, सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.