गुजरात विधानसभा निवडणूक 2022: गुजरात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढविला असून येत्या 22 तारखेपासून राहुल गांधी सुद्धा गुजरातमध्ये प्रचार सभा घेणार असल्याने भाजपच टेन्शन वाढल असल्याच राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यातच महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला मिळणार समर्थन समस्त गुजरात बघत आहे. कालची शेगाव येथे भारत जोडो पदयात्रेची झालेली विशाल सभा पाहून राहुल गांधींची लोकप्रियता वाढत असल्याच दिसते. तर भाजपला पुन्हा गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले असून येत्या 15 दिवसांत गुजरातमध्ये जवळपास 25 सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी गुजरातमध्ये पोहोचणार आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा कार्यक्रम आहे. 19 नोव्हेंबरला संध्याकाळी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी वलसाडमध्ये एका सभेला संबोधित करतील.
दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिराला भेट देतील आणि त्यानंतर सौराष्ट्र भागात चार सभांना संबोधित करतील. वेरावळ, ढोरर्जी, अमरेली, बोताड येथे सभांना संबोधित करणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्रातील या विधानसभा जागांवर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाने राज्याच्या निवडणुका जिंकल्या पण काँग्रेसचा बालेकिल्ला तोडू शकले नाही. गुजरात मध्ये कॉंग्रेस पुन्हा नव्या ताकदीने भाजपशी दोन हात करायला सज्ज आहे. त्यातच देशात राहुल गांधीची सुधारत चाललेली प्रतिमा भाजपचे मोठ टेन्शन वाढविणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांच आहे.
2017 च्या गुजरात निवडणुकीत भाजपने एकूण 182 जागांपैकी 99 जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून पक्षाची सत्ता आहे आणि नरेंद्र मोदी हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. यावेळी, पीएम मोदी, अमित शहा आणि सीआर पाटील यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाने 140 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे राज्य दीर्घकाळापासून भाजपचा बालेकिल्ला आहे आणि सातव्यांदा सत्तेत येण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.
गुजरातमध्ये 182 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.