एलसीबीची कारवाई – तासगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील एकाचा समावेश
सांगली – ज्योती मोरे.
सांगली शहरासह मिरज परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील पसार झालेल्या शाहबाज ऊर्फ जॅग्वार रियाज शेख (वय २४ रा. साईनाथनगर पसायदान शाळेसमोर कर्नाळ रोड सांगली), वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) सचिन सर्जेराव पाटील (वय २९ रा. वंजारवाडी ता. तासगांव), औषध विक्रेता अमोल शहाजी चव्हाण (वय ३८, रा. बेंबळे चौक टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी, मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यात बेकायदेशीरपणे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मोहिम राबवण्यात आली होती. त्यामध्ये काही ठिकाणी छापे मारून संशयितांना अटक केली होती.
या कारवाईवेळी काहीजण पसार झाले होते, त्यांचा शोध सुरू होता. संशयित शाहबाज ऊर्फ जॅग्वार शेख हा शिवशंभो चौकात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.त्याप्रमाणे सापळा लावुन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अनिकेत विजय कुकडे, उमर सलीम महात (रा. सांगली) व मिरज येथील राहुल सतीश माने, गौस हुसेन बागवान यांना नशेच्या गोळ्या विक्री केल्याची कबुली दिली.
गोळ्या कोठून आणल्या याची चौकशी केल्यानंतर एमआर असलेल्या सचिन सर्जेराव पाटील (रा. वंजारवाडी) आणि औषध विक्रेता अमोल शहाजी चव्हाण (रा. बेंबळे चौक, टेंभुर्णी ता. माढा) यांच्याकडून बेकायदेशीरपणे खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे सचिन पाटील व अमोल शहाजी चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी जग्वारला गोळ्या विक्री करत असल्याची कबुली दिली.
सचिन पाटील हा पूर्वी वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.) म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याची ओळख दुकानदार अमोल चव्हाण याच्याशी होती. त्यातूनच या गोळया डॉक्टरांच्या कोणत्याही चिट्टीशिवाय व कोणतेही रेकॉर्ड न ठेवता दिले गेल्याचे निष्पन्न झाले. तिघांना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, अंमलदार अमोल ऐदाळे, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, प्रकाश पाटील, अनिल कोळेकर, सागर लवटे, संकेत मगदुम, बिरोबा नरळे, बाबासाहेब माने, संदीप गुरव, अजय बेंदरे, विक्रम खोत, दिपक गट्टे, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.