नांदेड – महेंद्र गायकवाड
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे हिंदुत्वगर्जना कार्यक्रमा प्रसंगी मराठा आरक्षणा वरून केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून तानाजी सावंत यांनी केलेले विधान दुर्देवी असल्याचे चव्हाण यांनी म्हण्टले आहे.
विविध मुद्यावरून चर्चेत असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला असून एका कार्यक्रमात आताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता.यावरून त्यांच्यावर चौफर टिका होत आहे.त्यांनी केलेल्या विधानावर अशोकराव चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की,
मराठा आरक्षणाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. संवेदनशील विषयांवर गांभीर्यपूर्वकच बोलले पाहिजे. मुळात मराठा आरक्षण ही एखादी राजकीय मागणी नसून, सकल मराठा समाजाची वस्तुनिष्ठ मागणी आहे. त्याकडे राजकीय चष्म्यातून बघणे योग्य नाही.