नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाग आज दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले तर काही भागात गारांसह पाऊस झाला यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरचे टीनशेड उडाले तर शेतकऱ्यांच्या झोपड्यांचेही मोठे नुकसान झाले. उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वादळी वाऱ्यामुळे फटका बसलेल्या सर्व भागांचे त्वरित वाचनाने करावेत आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आज दिनांक 16 मार्च रोजी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नांदेड तालुक्यातील काकांडी, लोहा तालुक्यातील मारतळा, नायगाव तालुक्यातील काहळा, कृष्णुर, अर्धापूर तालुक्यातील बारड ,लहान, देगाव , पिंपळगाव यासह जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. केळीच्या बागांना फटका बसला आहे . गव्हाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळवून देण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी आदेशित करावे आणि शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारशीही लवकरच बोलणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिक मदतीसाठी प्रयत्न करू अशी माहिती ही खा. चिखलीकर यांनी दिली आहे.