राहुल मेस्त्री
गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आज जागा आहेत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असा आदेश दिला असताना तो आदेश झुगारून अनेक कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ऊस दराचा तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गुरुवारपर्यंत तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेळगाव येथील विधानसभेसमोर रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. घटप्रभा- धूपदाळ येथे आयोजित रयत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे योग्य पद्धतीने झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाई पासून दूरच आहेत. यावर्षीही परतीच्या पावसामुळे सोयाबीन ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. साखर मंत्र्यांच्या बैठकीत ऊसाला साखर कारखाने आणि शासनाने मिळून प्रति टन ५ हजार ५०० देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. गुरुवारपर्यंत (ता.२०) शासनाच्या आदेशाची वाट पाहून शुक्रवारी (ता.२१)पासून बेळगाव येथील विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.त्यामध्ये जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी चुनाप्पा पुजारी,राघवेंद्र नाईक, रमेश पाटील गणेश येळगेर, गोपाल कोकटनूर, रवी सिद्धनावर, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, मल्लाप्पा अंगडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.