सांगली – ज्योती मोरे
पेठ रस्त्या संदर्भात 2017 पासून वेगवेगळ्या आंदोलनातून दाद तत्कालीन सर्व सरकारांच्याकडे मागण्यात आलेली होती.या सर्व आंदोलनातील जनआक्रोश पाहता या रस्त्याचा प्रश्न सुटणे आवश्यक असताना सर्व सताधारी व विरोधकांनी केवळ दिशाभूल व खोटी आश्वासने देण्याचे काम करून सदर रस्त्याचा प्रश्न जाणिवपूर्वक प्रलंबीत ठेवला आहे.
सदर रस्ता नॅशनल हाय-वे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत संदिग्धता असून या रस्त्याच्या विकासा संदर्भात नागरी भावनांचा फुटबॉल करून प्रश्न प्रलंबीत ठेवण्याचे कारस्थान राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी करत आहेत.
सदर रस्ता सांगलीच्या सामाजिक व आर्थिक उन्नती संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे.पेठ येथून पुणेकडे जाणारे वाहन 2 तासात पुण्यात पोचते तेवढाच वेळ पेठ वरून सांगलीला येताना लागतो हे दुर्दैव आहे.याशिवाय या रस्त्यावरील अपघातांनी अनेकांचे जीव घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम केले आहे.
सध्या सांगली शहरापासून मोजक्या अंतरावर अनेक राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असून हा सांगली पेठ रस्ता पूर्ण करून त्याची कनेक्टिव्हिटी संबंधीत राष्ट्रीय महामार्गांच्या सोबत होणे क्रमप्राप्त व नागरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी व या रस्त्याच्याकडे राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे निर्माण झालेल्या अधोगतीमधून स्वातंत्र्य मिळवून चारपदरी सांगली पेठ रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून सांगली शहराच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी 15 ऑगस्ट 2022 रोजी असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा दिवशी सांगली पेठ रस्त्यावर जनआंदोलन उभारले जाणार आहे.या आंदोलनात सांगली-पेठ रस्त्यावरील सर्व गावातील नागरिकांनी त्यादिवशी रस्त्यावर येऊन सांगली-पेठ रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील,माजी आमदार नितीन शिंदे,सतीश साखळकर,उमेश देशमुख,विकास मगदूम,असिफ बावा,युसूफ मिस्त्री,संजय नायर,प्रविण पाटील,संजय पाटील,महेश पाटील,कामरान सय्यद,आनंद देसाई,पै.विश्वजित पाटील,राहूल पाटील,प्रशांत भोसले.