- राष्ट्रीय आदर्श विद्यालयातिल विद्यार्थ्यांच्या संयमाचा फुटला बांध
- रामटेक ते कोदामेंढी दरम्यान ठीकठिकाणी बसथांबे देण्यासंदर्भात दिले निवेदन
- दोन तास केले ठिय्या आंदोलन
- बस वाहकाच्या अपशब्दात बोलण्याचा केला निषेध
रामटेक – राजु कापसे
कोदामेंढी ते रामटेक दरम्यान असलेल्या विविध बस थांब्यावर रामटेक येथील शाळेत येण्यासाठी उभे असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बस मध्ये न घेता चालक – वाहक बस सरळ काढत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसची वाट पाहत थांबावे लागत असल्याकारणाने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो.
त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. या अनुषंगाने आज दिनांक 21 सप्टेंबरला राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शालेय विद्यार्थी तथा शिक्षकांनी संतापून जाऊन स्थानिक बस स्थानक येथे तिव्र ठिय्या आंदोलन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार रामटेक ते कोदामेंढी दरम्यान असलेल्या भांडेवाडी, आरोली, मसला, खंडाळा, घोटी, बोरी येथील बस थांब्यांवर एसटी महामंडळाची बस बहुतांश वेळी थांबत नसल्यामुळे येथे रामटेक येथील शाळेत जाण्यासाठी बसची वास वाट पाहत थांबलेल्या शालेय विद्यार्थ्यांची फार गोची होत असते व परिणाम स्वरूप त्यांना रामटेक येथील शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो.
आज दिनांक २१ सप्टेंबरला मसला येथील विद्यार्थी राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथे तब्बल दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोहोचले ते यावेळी संतापलेल्या मुद्रेमध्ये होते त्यांना यावेळी शिक्षकांनी उशीरा येण्याचे कारण विचारले असता शालेय विद्यार्थ्यांनी सांगितले की बस लवकर न आल्यामुळे व बस ने थांबा न घेतल्यामुळे मागुन दुसऱ्या बस ची वाट पहात थांबावे लागले त्यामुळे आम्हाला शाळेत पोहोचण्यास एवढा उशीर झाला.
तेव्हा हे ऐकून विद्यालयातील शिक्षकही चांगले संतापले व शालेय विद्यार्थ्यांना घेऊन राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील शिक्षक यांनी सरळ रामटेक एसटी बस स्थानक गाठले व येथे तीव्र ठिय्या आंदोलन करीत रामटेक आगार व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान रामटेक आगार व्यवस्थापक क.ज. भोगे हे उपस्थित झाले. त्यांना यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विविध समस्या सांगितल्या. त्यामध्ये रामटेक ते कोदामेंढी दरम्यान असलेल्या बस थांब्यावर आपले एसटी वाहक व चालक बस थांबा घेत नाही तसेच बसवाहक हे विद्यार्थ्यांनाअप शब्दात बोलतात असे यावेळी विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले व संतापही व्यक्त केला.
तेव्हा विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्या व रामटेक ते कोदामेंढीदरम्यान असलेल्या बस थांब्यावर आवर्जून बस थांबा देण्यात यावा अशा मागण्या रेटुन धरण्यात आल्या. दरम्यान यावेळी राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शिक्षक अनिल कोल्हे हे व्यवस्थापनावर चांगलेच भडकले होते.
त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत एसटी महामंडळाच्या वरिष्ठांशी भ्रमणध्वनी ध्वनी वरून बोलणे करून तीव्र नाराजी व्यक्त करीत शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष बसेस सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी संबंधित वरिष्ठांनी सुद्धा त्यांची मागणी मान्य करत उद्या दिनांक २२ सप्टेंबर पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन बसेस सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मागणी पूर्ण झाल्यावर आंदोलन संपुष्टात आले.
आंदोलन सुरु असतांना माजी आमदार रेड्डी, प्रहार चे रमेश कारामोरे, नरेंद्र बंधाटे यांचेसह राजेश जयस्वाल, राजु हटवार, पप्पु यादव, नितीन गेडाम आदी. राजकिय उपस्थित झाले होते. यावेळी राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापक राजू बर्वे, संस्थेचे सचिव मयंक देशमुख, सहाय्यक शिक्षक संजु दर्यापूरकर, संजय सेलोकर, अरविंद कोहळे, रितेश मैद, राजेश भोतमांगे, संजय पिसे, प्रा. कमलेश सहारे यांचेसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
तर आम्ही तरी काय करावे
या आंदोलनादरम्यान बाजूलाच उभे असलेल्या काही चालक वाहकांशी चर्चा केली असता रामटेक आगारांमध्ये बसेस कमी आहेत तेव्हा अगोदरच विद्यार्थ्यांनी हाउसफुल भरलेली बस असताना आम्ही विविध बस थांब्यावर कसे काय थांबावे तसेच महामंडळाने पुष्कळ शहा बसेसचे मालवाहतूक बसेस मध्ये रूपांतर केल्याने आगारातील बसेस ची संख्या कमी झालेली आहे.
तेव्हा बसेस कमी आणि विद्यार्थी व प्रवाशांची संख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा अगोदरच बस फुल असल्याने विविध बस थांब्यावर बस कशी थांबवावी हा प्रश्न येऊन पडतो असे यावेळी काही एस.टी. वाहक व चालकांनी सांगीतले.
गरज ५५ बसेसची आहेत ४३ व्यवस्थापक भोगे
शालेय विद्यार्थ्यांच्या आज झालेल्या ठिया आंदोलनाबाबत तथा त्यांच्या समस्यांबाबत रामटेक बस स्थानकाचे व्यवस्थापक क.ज. भोगे यांना यावेळी विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की बस स्थानकामध्ये बसेसची संख्या कमी आहे. येथे जवळपास ५५ बसेसची गरज आहे मात्र येथे ४३ बसेस च उपलब्ध आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासांची कधीकधी गैरसोय होत असते.