आकोट – संजय आठवले
ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदाचीही निवडणूक झाल्याने नवगठीत झालेल्या या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका घोषित करण्याकरिता जिल्हाभरातून तसे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्याबाबतीत सर्व बाजू तपासून या निवडणुकीची तारीख घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचे असल्याने लवकरच जिल्हाभरातून या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. त्यासोबतच या निवडणुकीपूर्वीच सर्व नवनिर्वाचित सरपंचांना आपला कार्यभार ग्रहण करावा लागणार आहे.
सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्याने नवनिर्वाचित सरपंचांना आपला कार्यभार स्वीकारण्याकरिता काहीही अडचण उरलेले नाही. नवगठित ग्रामपंचायतींच्या पहिल्याच सभेत उपसरपंच पदाची निवडणूक सरपंचांच्या अध्यक्षतेखाली घ्यावयाचा कायदेशीर शिरस्ता आहे. त्यामुळे सर्वच नवनिर्वाचित सरपंचांना उपसरपंच निवडीपूर्वीच आपला कार्यभार ग्रहण करावा लागणार आहे. त्याकरिता उपसरपंच निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसह सरपंच पदाचा कार्यभार ग्रहण करण्याची जिल्हाभरात धांदल उडालेली आहे.
राजकीय सारीपाटावर ह्या हालचाली होत असतानाच जिल्हाभरातील नवगठीत ग्रामपंचायतींचा अहवाल प्रशासनास पाठविण्यात आला आहे. या अहवाला सोबतच नवगठीत ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावासोबतच या निवडणुका पार पाडण्याकरिता निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांची नावे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.
आकोट तालुक्यातील बांबर्डा ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता आरक्षित असल्याने व त्या जागी पात्र उमेदवार नसल्याने येथील सरपंच पद रिक्त राहिले आहे. परंतु नवनिर्वाचित सदस्यांमधून उपसरपंच निवडण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. नियमानुसार ही निवडणूक सरपंचांचे अध्यक्षतेखाली घेणे गरजेचे आहे. मात्र येथे सरपंच नसल्याने या ठिकाणी एक अध्यासी अधिकारी व एक निवडणूक केंद्र अधिकारी अशी दोन नावे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.
या सर्व प्रस्तावांच्या सर्व बाजू तपासून जिल्ह्यातील नवगठीत ग्रामपंचायतींचे उपसरपंच निवडीकरिता जिल्हाधिकारी यांनी निवडणूक तारीख घोषित करावयाची आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्या रजेवर असल्याने ही तारीख घोषित करण्याची जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी तथा अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार यांना पार पाडावी लागणार आहे. ही तारीख केव्हा घोषित होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.