मुंबई – ज्येष्ठ लेखक आणि पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. मागास व उपेक्षित समाजासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेला एक ज्येष्ठ कार्यकर्ता आज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रा. हरी नरके ओबीसी, मागास, वंचित, दलित समाज घटकाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रात हरी नरके यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रमुख समन्वयक अशा विविध शासकीय समित्यांवर त्यांनी उल्लेखनिय काम केले आहे. महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर संशोधनपर साहित्याची निर्मितीही नरके यांनी केली आहे.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी तसेच पुणे विद्यापीठांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रा. हरी नरके यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नरके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे अशा भावना व्यक्त करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली.