Sunday, December 22, 2024
Homeराज्यराज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती-२०२४ च्या बैठकीची...

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती-२०२४ च्या बैठकीची तयारी पूर्णत्वास..!

अकोला – संतोषकुमार गवई

जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या तसेच जागतिक पीक उत्पादन तथा उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेतीला बदलत्या परिस्थितीत कृषी क्षेत्रासमोरील अनेकानेक आव्हानांना सामोरे जाताना अधिक शाश्वत करण्याचे हेतूने महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या सर्वोत्कृष्ट उपलब्धींव्दारे शेतकरी बांधवांचे उत्थान साधण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत.

यांच शृंखलेत कृषि संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ५२ वी त्रिदिवसीय बैठक दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीविषयी सविस्तर माहिती देण्याचे दृष्टीने आज गुरुवार दिनांक ६ जून 2024 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला स्थित शेतकरी सदन येथील कृषी जागर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करतांना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी कृषी संशोधनाची एकूणच दीर्घकालीन व तांत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आपल्या अभ्यासपूर्ण संबोधनाद्वारे उलगडतांना पिकांच्या नवीन वाणांची निर्मिती, शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर अशा सुधारित यंत्रे व नाविन्यपूर्ण अवजारांची निर्मिती आणि पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा विविधांगी कृषी उत्पादन तंत्रज्ञानाच्या संशोधनात्मक शिफारसींचे बारकावे उपस्थित पत्रकार बांधवासमोर विस्तृतपणे विशद केले.

सदर महत्वपूर्ण बैठकीचे उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. विलास खर्चे, संचालक संशोधन, डॉ. पंदेकृवि, अकोला, डॉ. श्यामसुंदर माने, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी), डॉ. पंदेकृवि, अकोला, डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण,डॉ. पंदेकृवि, अकोला हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी,डॉ. पंदेकृवि, अकोला, श्री. सुधीर राठोड, कुलसचिव,डॉ. पंदेकृवि, अकोला आणि डॉ. नितीन कोष्टी, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव यांचीही उपस्थिती लाभली होती.

पुढे संबोधतांना त्यांनी विद्यापीठाच्या विगत 54 वर्षाच्या कालखंडामध्ये एकूण 181 पिक वाण, 52 यंत्रे व अवजारे १५७८ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारसींचा विशेषत्वाने उल्लेख करून कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांद्वारे करण्यात आलेले संशोधन अंतिम होऊन त्यास मान्यवरांची मान्यता प्राप्त होण्यासाठी सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या प्रस्तुत बैठकीची एकूणच रूपरेषा विशद करताना त्यांनी एकूणच पीक वाण निर्मिती, सुधारित यंत्रे व नाविन्यपूर्ण अवजारे तसेच पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान शिफारसी आदी संदर्भातील महत्त्वाचे टप्पे, आवश्यक निकष व लावण्यात येत असलेल्या कसोट्यांचा आढावा घेऊन अनेक बाबी सोदाहरण स्पष्ट केल्यात.

तसेच सदर पत्रकार परिषदे दरम्यान मा. कुलगुरू महोदयांनी कृषी विद्यापीठांद्वारे होत असलेले मोलाचे कृषी संशोधन शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार बांधवांव्दारे प्राप्त होत असलेले निरंतर सहकार्य आणि भरीव योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना वातावरण अनुकूल शेतीच्या दृष्टीने तसेच भविष्यातील शाश्वत स्वरूपाच्या शेतीसाठी कृषी संशोधनाची दिशा निश्चितीसाठी विद्यापीठांव्दारे प्राधान्याने राबविण्यात यावयाच्या संशोधनात्मक कार्यक्रमाचा ऊहापोह करुन सदर बैठकीमध्ये करण्यात येणार्‍या महत्त्वपूर्ण शिफारसींचे सादरीकरण माहिती दिली.

सदर त्रिदिवसीय बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी बांधवांसाठी व एकूणच कृषी क्षेत्राचे उत्थान आणि उर्जितावस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांचे सुधारित वाणांचे आणि सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रांचे प्रसारण तसेच उपयुक्त अशा कृषी उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशींवर मान्यवरांद्वारे मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक दरवर्षी राज्यातील एका कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येत असते. यावर्षी हा बहुमान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास मिळाला असल्यामुळे सदर बाब उल्लेखनीय ठरते.

यानुषंगाने,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे नवीन पिक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उत्पादन तंत्रज्ञान शिफारसी मिळून एकत्रितपणे 86 शिफारसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे 115 शिफारसी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे ५७ शिफारसी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीद्वारे 44 शिफारसी अशा एकूण 302 शिफारसींचे सादरीकरण संबंधित कृषी शास्त्रज्ञांद्वारे सभागृहातील मान्यवरांसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

सदर बैठकीचे काटेकोर नियोजन एकूण तीन तांत्रिक सत्रांमध्ये केले असून त्या अंतर्गत कृषी शास्त्र विषयक विविध १२ गटांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीचे प्रथम तांत्रिक सत्रामध्ये राज्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन संस्थांचे संचालक त्यांचे उपलब्धींचे सादरीकरण करणार आहेत. सोबतच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि इतर तीनही कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक देखील त्यांच्या महत्वपूर्ण संशोधनात्मक उपलब्धीचे सादरीकरण करणार आहेत.

त्याचप्रमाणे बैठकीच्या द्वितीय दिवशी आयोजित दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी शास्त्रज्ञांद्वारे विविध महत्वपूर्ण विषयांवरील संशोधनात्मक निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण होणार आहे. यामध्ये अनुक्रमे अन्नधान्य पिकांसाठी शेती पिके (पीक सुधारणा व धोरण), नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यान विद्या, पशु विज्ञान व मत्स्यपालन, मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, शेती पिके वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या पीके वाण प्रसारण समिती, कृषी यंत्रे व अवजारे प्रसारण समिती, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असणार आहे.

सदर बैठकीच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी समारोपीय कार्यक्रमांमध्ये उपरोक्त 12 तांत्रिक गटनिहाय मंजूर करण्यात आलेल्या शिफारसींचे वाचन होऊन सदर शिफारसींना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या या तीन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सुमारे 300 मान्यवर व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या शिफारसी पुढे शेतकरी बांधवांचा विकास आणि एकूणच उत्थानासाठी कृषी विभागामार्फत प्रसारित करण्यात येत असतात.

अशाप्रकारे दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती -2024 या अतिशय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तिनही दिवस महत्त्वपूर्ण अशा कृषी संशोधनात्मक व संवादात्मक तांत्रिक सादरीकरणाच्या माध्यमातून आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि ऋणनिर्देश विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.सदर पत्रकार परिषदेला पत्रकार बंधू भगिनींची आणि संबंधित समित्यांच्या सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: