राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे सेशन कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून माहिती दिलीय,15 हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या गंभीर आरोपांप्रकरणी त्यांना दिलासा मिळालाय. पण कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे पोलिसांना तपासासाठी सहकार्य करणं.
ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने युक्तीवाद केला. चव्हाण यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडीओदेखील कोर्टात सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिलेला नसल्याचं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहीण मानतात. मग बहीण मानणाऱ्या महिलेचा ते विनयभंग कसा करतील? असा सवाल वकिलांना कोर्टात उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाडांना तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याची अट कोर्टाकडून ठेवण्यात आलीय. पोलीस जेव्हा बोलावतील तेव्हा आव्हाडांना पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल, असं कोर्टाने नमूद केलंय. त्यानंतर कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांचा जामीन मंजूर केला.