गणेश तळेकर
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे.
पहिल्यांदाच एकत्र सूत्रसंचलन करण्याचा आनंद या दोघांनीही व्यक्त केला. या दोन्ही कलाकारांचा हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व याद्वारे अचूक टायमिंग साधणारे प्रसाद आणि श्रेया सूत्रसंचलनाची बॅटिंग ही दमदार करतील हे वेगळं सांगायला नको.
TV9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारासाठी ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तर मालिका विभागात ‘रमा राघव’,’भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका स्पर्धेत आहेत.