नांदेड – महेंद्र गायकवाड
भाऊराव चे दोन युनिट विकले राहिलेल्या जमिनी विकण्याचे ठराव घेतले तरीही शेतकऱ्यांना साधा एफआरपी न देता जिल्यातील विरोधकांना संस्था चालवण्याचे ज्ञान नाही अशी टीका करणाऱ्या अशोकराव चव्हाण यांचे कोरडे ज्ञान शेतकऱ्यांच्या काय कामाचे असा संतप्त सवाल शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केला.
नुकतीच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न झाली त्यात ठराव क्रमांक 17 शंकर वाघलवाडा कारखान्यालगत असलेली भाऊराव ची 10 एकर जमीन विकण्याचा ठरावही सर्वानुमते संमत करून घेतला.खेदाची बाब म्हणजे यावर एकाही सभासदांनी विरोध दर्शवला नाही की जाब विचारला नाही.
यावेळी बोलताना कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आमदार अशोकराव चव्हाण म्हणाले की जिल्ह्यातील विरोधकांना संस्था चालवण्याचे ज्ञान नाही त्यांनी सहकार मोडीत काढला त्यामुळे त्यांनी बोलू नये. अशोकरावांच्या या विधानाची खरंतर सर्वत्र टिंगलटवाळी झाली त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले म्हणाले की अशोकरावांचे वक्तव्य म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या उक्ती सारखे आहे.
भाऊराव च्या चार पैकी दोन युनिट विक्री केले. राहिलेल्या जमिनी विकण्याचे ठराव घेतले तरीही शेतकऱ्यांना एफआरपी चे पैसे नाही , कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही, वाहतूकदारांना कोणत्याही सुविधा नाही तरीसुद्धा भाऊराव प्रचंड कर्जाच्या बोजाखाली का दबलेला आहे.
याचे उत्तर अगोदर जनतेला द्यावे . रबरी शिक्का म्हणून कार्यरत असणाऱ्या गणपत भाऊच्या नावे खापर न फोडता कारखान्याच्या अधोगतीची नैतिक जबाबदारी स्वीकारून दोन कारखाने विकून आलेले पैसे कुठे गेले ? शेतकऱ्यांचा एफ आर पी का दिला नाही? मागील बाकीचे का? कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार का नाही? वाहतूकदारांना कोणत्याही सुविधा का नाहीत?
याचा खुलासा ज्ञानी असणाऱ्या नेत्यांनी करावा विरोधकांच्या अज्ञानावर बोलावे अन्यथा तोपर्यंत त्यांच्या कोरड्या ज्ञानाला काहीही किंमत राहणार नाही अशी टीका शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी अशोकराव चव्हाण यांच्या वक्तव्यावर केली.