आठ दिवसात अनुदानाची देयके उपलब्ध करून न दिल्यास शासन व प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन उभे करणार
रामटेक – राजु कापसे
रामटेक:- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर पात्र लाभार्थ्यांना काम प्रारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार त्यांनी त्यांचे जुने बांधकाम तोडून योजनेप्रमाणे नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली. तात्पुरत्या स्वरूपात राहण्याच्या प्रश्न निर्माण झाल्याने सर्वच लाभार्थ्यांनी किरायचे घर घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु अचानकच लाभार्थ्यांना अनुदानाची देयके मिळणे बंद झालीच. काहींना तर पहिल्या टप्प्यातील अनुदान सुद्धा मिळाले नाहीत.
एकीकडे तात्पुरत्या स्वरूपात राहत असलेल्या घराच्या किरायाच्या रकमेचा भुर्दंड, तर दुसरीकडे बांधकाम साहित्याचा कर्जाचा त्रास व इमारत बांधकाम कंत्राटदाराचे कर्ज यात सर्वसामान्य रोजमजुरी करणारा लाभार्थी आर्थिक अडचणीत आलेला आहे. अनुदान मिळत नसल्याने अनेकांनी बांधकाम अर्धवट सोडून दिलेले आहे. राहण्यासाठी असलेले कच्चे घर तोडून, पक्के घर बनेल ही आशा मनाशी बाळगून असलेला लाभार्थी आज आपण चुकलो, कुठेतरी फसलो..!
असल्याची भावना बोलून दाखवत आहे. आम्ही रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद, रामटेक यांना निवेदन देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर पात्र लाभार्थ्यांची मागील अनेक महिन्यांपासून रडखडलेले अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे.
यावेळी श्री दामोधर धोपटे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी यांच्या सहित श्री शैलेंद्र (भीमा) नागपुरे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी (असंघटित कामगार विभाग) श्री संजय बागडे अध्यक्ष रामटेक विधानसभा (रोजगार व स्वयंरोजगार विभाग) श्री ताराचंद धनरे बाबू अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) श्री अविनाश कोल्हे, श्री अश्विन सहारे, श्री वसंता दुंडे, श्री अन्वर शेख, श्री धनराज महाजन, श्री जीवतू नान्हे, श्री शुभम नान्हे, श्री साहेबराव वरवाडे, श्री श्रावण पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.