गेल्या रविवारी खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळा पार पडला या सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचे मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडवून दिली होती, सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे हि घटना घडल्याचे विरोधी पक्षांकडून आरोप लावण्यात आले आहेत. तर आता या घटनेत मृत्यू झालेल्या १४ श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे.
कालच कॉंग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने झाले हे सरकारने स्पष्ट करावे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र लिहून केली आहे.
काय आहे शवविच्छेदन अहवालात?
सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान ६ ते ७ तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. कार्यक्रमस्थळी कडक उन्हात आणि उकाड्यात त्यांना बसावं लागल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती, “त्यातल्या काहींना पूर्वव्याधीही होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी काही तास काही खाल्लेलं नव्हतं किंवा पाणी प्यायलं नव्हत. ४० अंश सेल्सिअस तापमानात ते तिथे बसले होते”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे. या सरकारला जनाची नाही तर मनाची असती तर आतापर्यंत राजीनामे दिले असते पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे परंतु काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले…