Monday, December 23, 2024
HomeराजकीयPolitics | भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला...

Politics | भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी…नाना पटोले

भाजपच्या पापांची यादी इतकी मोठी आहे की माफी मागताना घासून घासून नाक राहणार नाही.

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच.

भाजपाच्या पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना घरी बसवेल.

Politics : मुंबई, दि. २१ ऑक्टोबर, देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफी मागायला सांगावी असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे भाजपा नेते सातत्याने खोटे बोलत असतात. कंत्राटी पद्धतीच्या नोकरी भरतीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना भाजपाचा हा खोटारडेपणा समजतो. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे भाजपा सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी परिक्षा, तलाठी भरती मधील घोटाळा, हे पाप भाजपाचेच आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षापासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. एमपीएससी चा सावळा गोंधळ सुरुच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार व महत्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

शिंदेप्रणित भाजपा सरकारने वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस सारखे विविध मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवून महाराष्ट्रातील आपल्याच लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप केले. शेतकरी आत्महत्या वाढल्या, शेतमालाला भाव नाही याचे पाप भाजपा सरकारचेच आहे. गुन्हेगारी वाढली, महागाई वाढली, सत्ताधारी आमदार खासदारांची दादागिरी वाढली, खोके घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे पापही भाजपानेच केले आहे. या सर्व पापांबद्दल भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची शंभरवेळा नाक घासून माफी मागतली तरी त्यांचे पाप फिटणार नाहीत. राज्यातील जनता भाजपाचा कुटील डाव ओळखून आहे, भाजपाचा पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना घरी बसवेल, असेही पटोले म्हणाले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: