Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीसंशयित आरोपी मृत्यू प्रकरणी त्या पोलीस अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी…आणखी दोन आरोपींचा शोध...

संशयित आरोपी मृत्यू प्रकरणी त्या पोलीस अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी…आणखी दोन आरोपींचा शोध जारी…

आकोट – संजय आठवले

आकोट पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणात तपासाकरिता आणलेल्या संशयित आरोपीला संबंधित पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने त्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या दोघांची आकोट न्यायालयात पेशी केली असता, आकोट न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान या मृत्यू प्रकरणात आणखी दोन आरोपी सामील असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध जारी असल्याचे सीआयडी अधिकाऱ्यांनी न्यायालयास सांगितले.

वाचकास स्मरतच असेल कि, तीन महिन्यांपूर्वी आकोट शहर पोलीस ठाणे येथे मोबाईल चोरीची एक तक्रार करण्यात आली होती. त्या मोबाईलच्या तपासाकरिता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांचे पथकाने गोवर्धन हरमकार या युवकास चौकशी करिता ताब्यात घेतले होते. त्यावेळी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्या युवकाचा मृत्यू झाल्याची कैफियत मयत युवकाच्या चुलत्याने पोलिसात केली होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांनी त्वरित दखल घेऊन राजेश जवरे आणि चंदू सोळंके या दोघांना निलंबित केले होते.

त्या दरम्यान ह्या कैफियत ची दखल राज्य विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांनीही घेतली. त्यामुळे सदर प्रकरणी सीआयडी विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित करण्यात आले. सीआयडी पथकाने राजेश जवरे आणि चंदू सोळंके यांना ताब्यात घेऊन आकोट न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने या दोघांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार पोलीस कोठडी संपल्याने या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले गेले.

त्यावेळी या दोघांची अधिक चौकशी करिता गरज नसल्याने सीआयडी पथकाने या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली नाही. परंतु या प्रकरणात आणखी दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याचे आणि त्यांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती त्यांनी न्यायालयास दिली. त्यावर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट चव्हाण यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवाना केले.

या प्रकरणाबाबत शहरात जबर चर्चा सुरू असून राजेश जवरे यांचे बाबत रोजच नवनवीन किस्से कानी येत आहेत. काही किस्से ऐकल्यावर तर एक पोलीस अधिकारी असे वर्तन कसे काय करू शकतो? असा प्रश्न मनात निर्माण होत आहे. येथे उल्लेख करणे गैर ठरणार नाही कि, अनेक व्यापारी, सुवर्णकार, पान टपरीधारक या लोकांमध्ये जवरे यांचेवर होत असलेल्या कारवाईने समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु आकोट शहर पोलीस ठाण्यातील वातावरण मात्र अतिशय बेचैन आणि अस्वस्थ झालेले आहे. अधिकारी मनोमन भयभीत झालेले आहेत. असे वातावरण आकोट शहराकरिता अजिबात पोषक नाही.

त्यातच शहरात आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे बरेच प्रसंग यशस्वी पार पडल्यानंतर ठाणेदार तपन कोल्हे यांचे जुने शारीरिक दुखणे उफाळले आहे. त्याचे उपचार याकरिता त्यांना जाणे आवश्यक होते. मात्र निवडणूक काळात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज त्यांना जाता येणार नसल्याचे वरिष्ठांनी सांगितल्याने ठाणेदार कोल्हे मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र त्यांच्या या रजा काळात आकोट शहर पोलीस ठाण्याचे बेचैन वातावरण ठीक करणारा अनुभवी आणि प्रशासन कार्य कुशल अधिकारी येणे आवश्यक आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: