Wednesday, December 11, 2024
Homeराज्यपोलीस कोठडी मृत्यू प्रकरणी पो. उ.नि. राजेश जवरे यांचा जामीन रद्द…२० डिसें....

पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणी पो. उ.नि. राजेश जवरे यांचा जामीन रद्द…२० डिसें. पूर्वी तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा आदेश…नागपूर उच्च न्यायालयाचा दणका…

आकोट – संजय आठवले

पोलीस स्टेशन आकोट येथे कार्यरत पोउनि राजेश जवरे यांनी संशयावरून अटक केलेला आरोपी गोवर्धन गणेश हरमकार याच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पोउनि राजेश जवरे व पोहेकाॅं चंद्रप्रकाश सोळंके यांना जबाबदार ठरवून त्यांचे वर दाखल गुन्ह्यात आकोट सत्र न्यायालयाने त्यांना दिलेला जामीन नागपूर खंडपीठाने रद्द ठरविला असून या दोन्ही अपराध्यांना २० डिसें. २०२४ पूर्वी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश फर्मावले आहेत. त्यामुळे जवळपास एका वर्षांपूर्वी घडलेले हे गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी कि, दि.१६/४/२०२४ रोजी फिर्यादी सुखदेव हरमकार यांनी आकोट पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली. ज्यामध्ये म्हटले गेले कि, आकोट शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांनी गोवर्धन गणेश हरमकार ह्याला दि.१५/४/२०२४ रोजी अटक करून आकोट शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथून त्याला ग्राम सुकळी येथील त्याचे राहते घरी आणले. तेथे त्याचे घराची झडती घेण्यात आली. परंतु या झडतीत काहीच आढळले नाही. गावात पोलीस आल्याने या ठिकाणी गावकरी मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी गोवर्धन हरमकार आणि फिर्यादी सुखदेव हरमकार यांना मारझोड केली. त्यानंतर गोवर्धन व त्याचा काका सुखदेव हरमकार यांना पुन्हा आकोट शहर पोलीस स्टेशनला आणले गेले.

त्या ठिकाणी पुन्हा गोवर्धनला अमानुष मारहाण करण्यात आली. त्या सोबतच सुखदेव हरमकार यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गोवर्धनच्या जिव्हारी मार लागल्याने त्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि चंद्रप्रकाश सोळंके यांनी त्याला आकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु तो अत्यवस्थ असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी गोवर्धनला अकोला येथे हलविण्यास सांगितले. परंतु तसे न करता त्याला अकोला येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दि१७/४/२०२४ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या फिर्यादीवरून आकोट पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके तथा त्यांचे सहकारी रवी सदाशिव, मनीष कुलट, विशाल हिवरे, प्रेमानंद पचांग, सागर मोरे यांचे वर गुन्हे दाखल केले. त्यानंतर तपासा दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांनी अटकपूर्व जामीनाकरिता आकोट सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेतली. त्यामध्ये सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. हे दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी राजेश जवरे आणि चंद्र प्रकाश सोळंके यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ह्या निकालाने व्यथित झालेले मृतकाचे काका सुखदेव हरमकार यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी दि.९/१२/२०२४ रोजी सुखदेव हरमकार यांचा अर्ज मंजूर केला. आणि गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांना आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी दिलेला जामीन रद्द ठरविला. त्यासोबतच या दोन्ही आरोपींनी या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे समक्ष २० डिसें. २०२४ रोजी अथवा त्यापूर्वी हजर राहण्याचे फर्मान जारी केले.

ह्या प्रकरणात तक्रारदारा तर्फे ॲड. ए. व्ही. कर्णावत यांनी, सरकारी पक्षातर्फे ॲड. हैदर यांनी तर आरोपीतर्फे ॲड. जे. एम. गांधी यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. ह्या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी घेतलेल्या न्याय्य व ताठर भूमिकेमुळे आकोट परिसरात सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे. या सर्व घडामोडींपूर्वी या प्रकरणात आकोट शहर येथील पोलीस शिपाई १. रवि सदाशिव, २. मनिष कुलट, ३. विशाल हिवरे, ४. प्रेमानंद पचांग, ५. सागर मोरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांच्या समक्ष दाखल केला होता.

ह्यावेळी सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवाद केल्यानंतर वरील पाचही पोलीस शिपायांचा अटकपूर्व जामीन अर्ज आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी दि. १८.०६.२०२४ रोजी फेटाळला. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील या वरील पाचही पोलीस शिपायांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर वरील पाच शिपायांपैकी विशाल हिवरे, मनिष कुलट व रवि सदाशिव यांना या प्रकरणात तपास अधिकारी सी.आय. डी. अमरावती यांनी अटक केली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी प्रमोद नलवाडे सी आय. डी. अमरावती पोलीस उपअधिक्षक हे तपास करित आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: