गडचिरोली – मिलिंद खोंड
गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील भूमकान गावानजीकच्या जंगलात बुधवारी (दि. २८) रात्रभर पोलीस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या हेतूने कसनसूर, चातगाव दलम आणि छत्तीसगडमधील औंधी दलमचे नक्षलवादी एटापल्ली तालुक्यातील भूमकान गावानजीकच्या जंगलात एकत्र आले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंदीय राखीव दलाच्या जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांना त्या भागात पाठविण्यात आले.
संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वा.पर्यंत पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. नक्षल्यांनी बॅरल ग्रेनेड लाँचरचा मारा केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतवून लावला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीपासून पहाटे साडेचारपर्यंत चकमक उडाली. यात कुणीही जखमी झाले नाही. नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.
आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळावरुन बॅटरी, वायर, पिट्टू आणि अन्य जीवनावश्यक साहित्य ताब्यात घेतले. पोलिस या भागात अजूनही नक्षलविरोधी अभियान राबवीत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.