Monday, November 18, 2024
Homeराजकीयमुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे !: नाना पटोले...

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे !: नाना पटोले…

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेच्या पैशांची लूट

भारतीय जनता पक्षासाठी कोणाताही धर्म नाही, केवळ ‘सत्ता हाच भाजपाचा धर्म’.

विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल.

मुंबई, दि. १८ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पंतप्रधान मोदींनी बोलावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जी २० परिषदेसाठी मुंबई विमानतळाच्या परिसरात पडदे लावून मुंबईचे ‘खरे दर्शन’ होऊ नये याचा प्रयत्न केला होता. त्या कापड्यावर मोदींचे फोटो लावून ठेवले होते. आताही मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत.

राज्यात वर्षभरात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे या प्रश्नावरही पंतप्रधानांनी बोलले पाहिजे. भाजपा सरकार अन्नदात्याची गळचेपी करण्याचे काम करत आहे त्यावरही त्यांनी बोलावे. मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सरकारी पैशातून अनेक वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देऊन वारेमाप प्रसिद्धी केली आहे.

भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम विषयावर राजकारण करत आहे परंतु भाजपाला पराभव दिसू लागल्याने आता त्यांना मुस्लीम समाजाची आठवण झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लीम समाजाबरोबर संवाद वाढवण्याचे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे. मुस्लीम समाजाबद्दल मोदी किंवा भाजपाला प्रेम नाही. भारतीय जनता पक्षाचा कोणताही धर्म नाही, केवळ सत्ता हाच त्यांचा धर्म आहे आणि ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे तसेच काँग्रेस पक्षातही कोणताच गोंधळ नाही. नाशिक मतदारसंघात भाजपाला उमेदवारही मिळाला नाही, दुसऱ्यांचे घर फोडणे हीच भाजपाची परंपरा आहे.

महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेची निवडणुक लढवत असून पाचही जागांवर मविआला विजय मिळेल. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असून शिक्षक व पदवीधर मतदार या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवतील, असेही पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दावोसला जाऊन महाराष्ट्रासाठी मोठी गुतंवणूक आणल्याचा त्यांचा दावा आहे पण हे फक्त सामंजस्य करार झालेले आहेत. यापूर्वीही असे अनेक करार झाले पण त्यातील प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे पाहणे महत्वाचे आहे. दावोसला जाऊन गुंतवणूक आणण्याआधी मुख्यमंत्री गुजरातला गेले असते तर बरे झाले असते, असे पटोले म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: