कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे टांगणीलवर…गेल्या पंधरवड्यातील सहावा बळी…प्रशासन मात्र फडणवीसांच्या दिमतीला…
अकोला (आनंद चक्रनारायण , राजाभाऊ इंगोले )
राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या अकोला जिल्ह्यात शनिवारी रात्रीला सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक वृत्तरत्न सम्राटचे अकोला जिल्हा प्रतिनिधी असणारे प्रा रणजित देवराव इंगळे यांची निर्घुण हत्या झाल्याने अकोला शहरासह संपूर्ण विदर्भ तथा महाराष्ट्र हादरला आहे.
मृतक इंगळे हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून समाजातील अजातशत्रू व्यक्तिमत्वाची अश्याप्रकारे हत्या होणं हे अत्यन्त क्लेशदायक आह़े …
त्यांनी दिव्यांगबांधवांसाठी सातत्याने कार्य केले आहे.त्यांच्या हत्येच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
जुने शहर अकोला पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांचे आज रविवार १८ जून रोजी अकोला शहरात असल्यामुळे संपूर्ण पोलिस प्रशासन त्यांच्या दिमतीला जुंपलं होतं.
जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव रोड वरील गंगानगर परिसरात राहणारे प्रा.रणजीत इंगळे रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे जात असताना, मोबाईलवर कॉल आला. तेव्हा मोटारसायकल उभी करून, मोबाईलवर बोलत असताना, अज्ञात व्यक्तीने मागून येवून इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार घातला.
जोरदार वार घातल्याने डोक्यातून रक्तस्राव होवून इंगळे रस्त्यावर कोसळले. मारेक-याने जखमी इंगळेला ओढून उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागे नेऊन टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाले . काही वेळाने ही घटना उघडकीस आली. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प रात्रीला मृतदेह पोस्टमार्टमसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला मध्ये पाठवला.
या घटनेमुळे गीता नगर, गंगा नगर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एका कॅमे-यात ही घटना रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी या कॅमेरातील फुटेज ताब्यात घेतले असून, मारेकरी एकटा असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे केवळ डोक्यावरचं मोठा घाव असून, लूटण्याच्या उद्देशाने ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट होते. कारण त्यांच्या जवळील पैसे व वस्तू तशाच आहेत. अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयात काही काळ घड्याळी तासिका तत्वावर अध्यापन करणारे प्राध्यापक रणजीत इंगळे हे वधू वर परिचय मेळावा तथा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रसिद्घ होते.
दोन्ही पायांनी दिव्यांग असणारे प्रा. इंगळे हे समाजकारण तथा राजकारणात कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून अत्यन्त दूर होते. अजातशत्रू म्हणून सर्वत्र परिचित प्रा रणजित इंगळे यांची आजवर कोणाही सोबत शाब्दिक बाचाबाची देखील झाली नसल्याचे दिसून येते .
दरम्यान त्यांनी जुने बस स्थानक परिसरात सेतू केंद्र सुरू केले होते.
या ठिकाणी देखील कुणासोबत कधीही वाद झाला नसल्याचे परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची हत्या होण्यामागे नेमके कारण काय ? त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.मृत्यूसमयी त्यांचे वय 48 वर्षे होते…
त्यांच्या मृत्यूंचं कारण अद्याप उलगडलेले नसून अश्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाची कोणी हत्या कोणत्या कारणासाठी करू शकेल हे आवाहन त्यांच्या मृत्यूने पोलिस प्रशासनासमोर ठेवलं आह़े …अकोला शहरातील गेल्या पंधरवड्यात झालेला ही सहावी हत्या असून यां मागे कोण मास्टर माइंड आह़े की कोणी सीरियल किलर आह़े हे शोधणे सुद्धा पोलिस प्रशासनाचे काम आह़े…
प्रा रणजित इंगळे यांच्या मृत्यूची सी आय डी चौकशी करून आरोपीला त्वरित अटक करावी तसेच प्रा रणजित इंगळे यांच्या कुटुंबाला किमान पन्नास लाख रुपयांची तातडीने आर्थिक मदत करावी अशी दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांतर्फे महाराष्ट्रंशासनाकडे मागणी करण्यात येणारं आह़े…