सांगली – ज्योती मोरे.
सांगली विधानसभा मतदार संघातील अनेक विकासकांमाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. सांगलीतील नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, कवलापूर विमानतळ, पूरग्रस्त भागातील रस्ते यासह अन्य विकासकामांच्या प्रस्तावांचा यामध्ये समावेश आहे.
संबंधित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, जनस्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी उपस्थित होते.
आमदार गाडगीळ यांनी सोमवारी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महानगरपालिका क्षेत्रासह सांगली विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामाबाबत त्यांनी चर्चा केली. सांगली येथे सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासाठी ३८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निधीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नाट्यपंढरी अशी ओळख असलेल्या सांगली शहरात नाट्यगृह नाही. त्यामुळे तातडीने निधी मंजूर करावा असे मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.
जिल्ह्यात मोठा उद्योग, कवलापूर विमानतळा बाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘उडाण’ योजनेंतर्गत कवलापूर येथे विमानतळ विकसीत करावे अशी मागणी केली. यासह सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, पूरग्रस्त भागातील रस्ते व अन्य विकाकामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. दरम्यान सांगलीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. सांगलीच्या विकासाचे सर्व प्रस्ताव मार्गी लावू अशी ग्वाही यांनी दिली आहे, अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.