आलापल्ली, नागेपल्ली पाणीपुरवठा योजनेचा घेतला आढावा..
अहेरी – मिलिंद खोंड
नळ योजनेच्या थकित विद्यूत बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने वीज कापल्याने आलापल्ली, नागेपल्ली येथील पाणी पुरवठा योजना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती पुढे आली होती. याची दखल घेत.गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी तातडीने आज(रविवारी) आलापल्लीत दाखल होऊन आलापल्ली ,नागेपल्ली पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.
दोन्ही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला कडक निर्देश देत तात्काळ पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाचा भरणा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले..विशेष म्हणजे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यानी दहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत आज मूख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकारीवर्गासह अहेरी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.
जीवन प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्याने भर पावसाळ्यात दोन्ही गावातील नागरिकांची पाण्यासाठी फरफट होत होती.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संबंधित प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त होत होता. आता ,दोन्ही ग्रामपंचायत किती दिवसात थकीत वीज बिलाचा भरणा करून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करते याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायत व नागेपल्ली ग्रामपंचायत तर्फे जी.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आलापल्ली ,नागेपल्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी ,कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.