पातूर – निशांत गवई
पातूर 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री मिळालेल्या गुप्त माहितीवरून आलेगाव वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून सागवानाची अवैध वृक्षतोड करताना दोन आरोपी नामे 1 – संदीप भास्कर तेलगोटे व 2 – सुरेश जनार्दन धाईत यांना अटक केली. आलेगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आरोपी नामे संदीप भास्कर तेलगोटे हा अवैध वृक्षतोड करण्याचे उद्देशाने आलेगाव राखीव वनक्षेत्रात गेल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून वनक्षेत्रात मोठे सागवान झाड तोडून तुकडे करताना बॅटरीचे उजेडात दोन आरोपी आढळून आले. वनविभागाचे कर्मचारी आल्याची चाहूल लागतात चोरट्यांनी आलेगावच्या दिशेने धूम ठोकली. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून आरोपींना त्यांचे शेतात पकडले.
त्यावेळी आरोपीच्या शेतात शोध घेतला असता एका झोपडीमध्ये गवताच्या कुटारात कुऱ्हाड, आरी व सागवान चौकट आढळून आली. आरोपींना मुद्देमालासहित घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.
सदरील कार्यवाही आलेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विश्वनाथ चव्हाण, वनरक्षक अविनाश घुगे, लखन खोकड, विनोद पराते, गोपाल गायगोळ, सुरेश कदम यांनी पाळत ठेवून केली. आरोपी पैकी संदीप तेलगोटे यांनी यापूर्वीसुद्धा वन कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, शिवीगाळ करण्याचे गुन्ह्याची पोलिस स्थानकात नोंद आहे.
आरोपीने यापूर्वी सुद्धा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड केलेली आहे. सदरील कार्यवाहीचा पुढील तपास अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री डॉ. कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप ढेंगे करीत आहेत.