पातूर : अकोला जिल्ह्यातील सर्वात क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात आज हाणामारी झाल्याने पातूर पंचायत समिती चर्चेचा विषय बनली आहे.
पातूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनात एका जि.प. सदस्य व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद होऊन हाणामारी झाली असून यामध्ये एका अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या वृक्ष लागवडीची तक्रार तालुक्यातील एका ग्रामपंचायतने केली होती,
सदर तक्रारीच्या आधारे पातूर तालुक्यातील एका जि.प.सदस्याने संबधित कामाचे मस्टर काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावून तांदळी येथील वृक्षारोपणाचे बिल नं काढण्याचे तोंडी निर्देश दिले.त्यानंतर संबंधित कामाचे मस्टर थांबविल्यामुळे आज दि.६ मे २०२४ रोजी दुपारी सुमारे ४:०० वाजताच्या दरम्यान सदर कामाच्या कंत्राटदाराने म.न.रे.गा. च्या अधिकाऱ्यास संपर्क केला असता त्यांनी बिल काढण्यास जि.प.सदस्यांनी मज्जाव केल्याचे सांगितले वरून “तुम्ही गटविकास अधिकारी यांचा आदेश मानता की,पदाधिकारी यांचे तोंडी निर्देशानुसार काम करता असा जाब संबंधितांनी विचारला असता त्यांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचे दालनात बसलेल्या जि.प.सदस्यांनी बोलावून घेतले असता तेथे दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला असून त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.यावेळी चक्क गटविकास अधिकारी यांचे दालनात जोरजोरात शिव्यांची लाखोडी व तुंबड हाणामारी पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
तसेच आज घडलेल्या घटनेमुळे पातूर पंचायत समिती तालुकाभरात चर्चेचा विषय बनली आहे.वृत्त लिहिस्तोवर सदर प्रकरणी कुठलीही कारवाई झाली नव्हती मात्र या घटनेची दखल घेऊन वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.
स्थानिक राजकारणाने गढूळ झालेल्या पातूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारामध्ये जिल्हाभरात नावलौकिक मिळविले असून येथे अक्षरशः जंगलराज सुरू आहे.जिल्ह्यातील सर्वात क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी केवळ नामधारी असून शासकीय कर्मचारी पदाधिकारी यांच्या निर्देशाने काम करत असून गटविकास अधिकारी देखील या प्रवाहात सामील झाल्याने पातूर पंचायत समिती जंगलराजचा भाग बनत असल्याचे चित्र आहे.