विभागीय आयुक्तांना निवेदन: शासनाच्या निर्देशाचे पालन हाेत नसल्याचा आराेप…
पातूर – निशांत गवई
पातूर येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा पदभार हा बाळापूरचे नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे; मात्र नियमानुसार तसे करता येत नाही. तसे महाराष्ट्र शासनाचे याबाबत स्पष्ट निर्देश आहेत.
शासनाच्या जी. आर. चे पालन हाेत नसल्याचा आराेप करीत पातूर न. प. मुख्याधिकाऱ्यांचा पदभार काढून येथे नवीन नियुक्ती देण्याची मागणी पातूर येथील सलाबत खान हाफ़ीजउल्ला खान यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पातूरचे मुख्याधिकारी हे स्थानिक पातूर येथील रहिवासी असून प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये व शासनाच्या परिपत्रकानुसार स्थानिक रहिवासी अधिकान्यांना स्वतःचे गावातील प्रशासकीय पदभार देता येत नाही.
संदर्भीय शासनाच्या परिपत्रक क्र. १ नुसार नजिकचे नायब तहसीलदार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा पदभार देता येत होता; परंतु पातूर तहसीलचे नायब तहसिलदार यांना न देता बाळापूरचे नायब तहसीलदार व पातूरचे मूळ रहिवासी यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. वारंवार तक्रार केल्यावरही त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला नाही.
सन २०२४ मध्ये दि. १५.०३.२०२४ ला शासनाने काढलेल्या जि.आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, नगर परिषदचा कारभार फक्त शहरी विकास अधिकाऱ्यांकडे देता येते.
त्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून नवीन मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यापूर्वी दि. ०५.०८.२०२४ ला जिल्हाधिकारी अकोला दि. ०६.०८.२०२४ ला सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन यांच्याकडेसुध्दा तक्रार देण्यात आली आहे.
काय म्हणताे नियम…
राज्यातील नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी हे पद रिक्त असल्यास अथवा कार्यरत मुख्याधिकारी मोठ्या कालावधीकरीता अनुपस्थित/ रजेवर असल्यास, संबंधित नगरपरिषदेचा कार्यभार नायब तहसीलदार या पदापेक्षा कमी नाही, अशा अन्य महसूली अधिकाऱ्यांकडे किंवा नजिकच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपविण्याची तरतूद दि.०१.०९.२०१६ रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये करण्यात आली होती.
तदनंतर, राज्यातील ‘क’ वर्ग नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट. अ/ सहायक आयुक्त, गट-अ अधिका-यांची नियुक्ती करण्याबाबत दि. १५.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सबव, नगरपरिषदा/ नगरपंचायतीमधील रिक्त मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नजीकच्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक आहे.
पाणीपुरवठा अभियंत्याच्या बदलीची शिफारस
पातूर येथील नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता महेश राठाेड यांची बदली करण्याची शिफारस आमदार वसंत खंडेलवाल यांच्याद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई यांच्याकडे सादर केली आहे.
राठोड हे पातुर येथे १० ऑगस्ट २०२० पासून कार्यरत आहेत. ते ठेकेदार पद्धतीने काम घेत असल्यामुळे पातुर नगरपरिषदेत त्यांच्याकडून मूळ कामावर दुर्लक्ष हाेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.
पाणी पुरवठा हे अति आवश्यक असल्यामुळे लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही तसेच स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करीत आहेत व स्थानिक नागरिकांसोबत गैरव्यवहार करीत आहेत, याबद्दल त्यांच्य विरुद्ध अनेक तक्रारी येत आहेत तसेच त्यांचा पातुर नगरपरिषदेत ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे ते बदलीस पात्र असल्यामुळे त्यांची अकोला जिल्ह्यातून तात्काळ बदली करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.