निशांत गवई,पातूर
पातूर : यंदाचा वाढता कडक उन्हाळा, पाणी साठे कोरडेठाक पडत असताना पक्षांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण पातूर शहरातील विद्यार्थी यांनी ओळखून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ जलपात्र व अन्नपात्र तयार करून चिमणी पाखरांची पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
पातूर शहरातील महात्मा फुले नगर,बाळापूर वेस येथील रहिवासी विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत निसर्गरक्षणाचे भान ठेवून शाळेमध्ये आणि घरामध्ये चिमण्यांसाठी पाणवठे तयार करून झाडावर अडकवले आहेत.विविध आकाराचे मडके, गाडगी, प्लास्टिकच्या बाटल्या, खोकी वापरून त्यात पाणी भरता येईल अशा रचना करून उंचीवर ठेवून पाणवठ्याची सोय केलेली आहे. तसेच त्या शेजारी धान्य ठेवण्याची पण सोय केलेली आहे, त्यामुळे परिसरात दुपारी पक्षांसाठी पाण्याची उपलब्धता झालेली आहे.
यावर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे चिमण्या, पोपट, कावळे परिसरात तसेच घरी येत असल्याचे दिसून येत आहे. पाणवठे तसेच पक्षांसाठी कृत्रिम घरटी बनवण्याचे मोलाचे काम करणाऱ्या रवी बगाडे, प्रथमेश परमाळे,आदित्य निलखन, ऋतिक निखाडे, नितीन बोंबटकार,हर्षल परमाळे, सिद्धांत वानखडे, क्षितिज वानखडे,अंश मोहाडे, स्वप्निल परमाळे, ऋषी परमाळे, कार्तिक अटायकर,आदित्य अटायकर,किरण वानखडे,ज्ञानेश्वर देवकर,प्रेम सुरवाडे, प्रणव बंड, राहुल डोंगरे,ओम निखाडे,गौरव परमाळे, शुभम निलखन,धिरज परमाळे व हिंदुस्थानी फ्रेंड्स क्लब,महात्मा फुले नगर,बाळापूर वेस च्या सदस्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
चौकट :
चिमणी परिसंस्थेचे एक महत्त्वाचा घटक आहे. पण मागील अनेक वर्षात झालेल्या शहरीकरण, औद्योगीकरण, तसेच रस्ते, घरे यांच्या बांधकामामुळे चिमण्यांची संख्या फार कमी झालेली आहे. मुक्या प्राणी, पक्षांबद्दल प्रेम, जाणीव जागृती होण्यासाठी, निसर्ग समतोल आणि कमी कमी होत चाललेल्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेऊन चिमणी पाखरांच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामध्ये खंड पडणार नाही याची काळजी घेऊ.
– स्वप्निल सुरवाडे (सर्पमित्र तथा प्राणीमित्र)