६ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महामोर्चा
नांदेड – राजू कापसे
नांदेड सरकारी नोकर भरती खासगी कपन्यांकडून करण्याचा महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे तो तत्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने राज्य शासनाच्या निषेधार्थ ६ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील महात्मा ज्योतिराव फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय,
असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात विविध महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी, पी.एचडी सेट, नेट उत्तीर्ण पण तुटपुंज्या मानधनावर काम करणारे प्राध्यापक अशा सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन खासगीकरण – कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने संविधान दुगाने यांनी केलं आहे.
राज्यात मोठया प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांच्या हाताला रोजगार नाही. सरकारी नोकरीचे खासगीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन जायचे कुठं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी कंपनीमार्फत होणारी नोकर भरती तत्काळ रद्द करण्यात यावी.
६ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा. राज्य सरकारने ६२ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करून सरकारी शाळांचा दर्जा अधिक प्रमाणात वाढविण्यात यावा. सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी. प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने त्वरीत करण्यात यावी.
५५ हजार शिक्षकांची भरती पहिल्या टप्प्यात करण्यात यावी. राज्यातील सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात यावी. राज्यात वर्षभर होणाऱ्या विविध पदभरती प्रक्रियेसाठी ( मध्यप्रदेशच्या धर्तीवर) एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावा.
राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीवर कडक कायदा करण्यात यावा व पेपर फूट होणारच नाही याची दक्षता घ्यावी. कंत्राटी पोलीस भरती रद्द करून जाहीर केलेली भरती पूर्वीप्रमाणेच डिसेंबर महिन्यात राबविण्यात यावी. सरकारी क्षेत्राचे खासगीकरण व कंत्राटीकरण त्वरीत थांबविण्यात यावे.
वरील प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या घेऊन तुमच्या आमच्या भवितव्यासाठी व येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले असल्यामुळे किमान वरील मागण्यांशी संबधीत सर्वांनीच एक दिवस शाळा महाविद्यालय, शिकवणीवर्ग बाजूला सारून मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने संविधान दुगाने यांनी केले आहे.