Thursday, November 21, 2024
Homeकृषीकृषी विकासासाठी पाणी फाउंडेशन कृषी विद्यापीठ ऋणानुबंध क्रांतिकारी ठरेल…ज्येष्ठ सिने अभिनेता आमिर...

कृषी विकासासाठी पाणी फाउंडेशन कृषी विद्यापीठ ऋणानुबंध क्रांतिकारी ठरेल…ज्येष्ठ सिने अभिनेता आमिर खान

तीन दिवसीय शिवार फेरीचा दुसऱ्या दिवशी पानी फाउंडेशनच्या गटांनी विद्यापीठ फुलले

अकोला दि२१(संतोषकुमार गवई)शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात उसळला जनसागर! दुसऱ्या दिवशी तब्बल 40 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञान! ‘कोविड महामारीच्या काळात सामाजिक निर्बंध असताना सोयाबीन शेतीशाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम सुरू केले . आज शिवार फेरीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनची नाळ विद्यापीठाशी जोडली गेली . त्यामुळे भविष्यात येथील शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा ऋणानुबंध क्रांतिकारी ठरणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेता तथा पाणी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते व्यासपीठावरून बोलत होते. सखोल ज्ञानार्जनाने कृषी क्षेत्रामध्ये प्रगती साधता येणे शक्य आहे असे नमूद करून विद्यापीठातील प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यापीठाने शेतकऱ्यांकरिता निर्मित केलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसार होण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रयत्नात पाणी फाउंडेशन भरघोस योगदान देणार असल्याचे प्रतिपादित करून त्यांनी उपस्थित पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

तत्पूर्वी आज सकाळी नऊ वाजताच आमिर खान यांनी शिवाय फेरीसाठी नोंदणी करून प्रत्यक्ष प्रत्येक विभागाला भेट देत विद्यापीठाचे तंत्रज्ञान अगदी बारकाईने जाणून घेतले व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून येणाऱ्या काळात शाश्वत ग्रामोद्धाराचा वसा आपल्या सोबत नेला. मुख्य कार्यक्रम स्थळी विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार अमित झनक, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील यांनी समायोजित विचार मांडले. तर अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी सर्वांच्याच एकात्मिक प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक 20, शनिवार दिनांक 22 व रविवार दिनाक 23 सप्टेंबर 2024 दरम्यान आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे आजचे दुसरे दिवशी अवघ्या विदर्भातून गडचिरोली पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.त्याप्रसंगी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अकोला विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, आ अमित झनक, विठ्ठल सरप पाटील, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉक्टर अविनाश पोळ, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे,नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती. कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यर्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या विशेष वार्तालाप सोहळ्याचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी केले. विद्यापीठातील विविध उपलब्धीसह शाश्वत शेती संपन्न शेतकरी संकल्पना वास्तवात आणण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्नांना अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठापद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली व आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मितीसाठी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या.

यावेळी बोलतांना विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यापीठाच्या शिवार फेरी आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करून शेतकरी हितांच्या शासकीय योजनांची अतिशय उपयुक्त माहिती दिली. पानी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना मिटकरी यांनी अशा उपक्रमांची गरज देखील अधोरेखित केली तर आमदार अमित झनक यांनी विद्यापीठाच्या प्रगत तंत्रज्ञानाची व शेतकरी हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विस्तार कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अकोला कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन तथा विस्तार कार्यात अग्रेसर असून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची यशस्वी घोडदौड प्रतिपादित करत शेतकरी आणि विद्यापीठाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य तत्पर असल्याचे आपले मनोगत सांगितले. यावेळी शिवार फेरी सभामंडपात शेतकरी बंधू -भगिनी, युवक -युवती सह पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण विदर्भातून आलेल्या विविध बचत गट सदस्यांची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन वं आभार प्रदर्शन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

दरम्यान आज सकाळी 9 वाजेपासूनच विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकरी बांधवांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित २४ संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले. यंदा देखील अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 210 विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत.  या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली होती.

आज शिवार फेरीच्या पहिल्याच दिवशी 40 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा सोबत नेण्यासाठी गर्दी केली होती. अधिकाधिक शेतकरी बंधू भगिनीनी शिवार फेरीत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग व इतर संस्था देखील प्रयत्नशील असून शेतकरी बंधू -भगिनी, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विस्तार कार्यकर्ते आदिनी सहपरिवार शिवार फेरीत सहभागी व्हावे असे आवाहन कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले आहे.

एका दिवसभरात संपूर्ण विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी उशीर न करता सकाळी 9 वाजता शेतकरी सदन येथे नोंदणी करून शिवार फेरीसाठी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे. उद्यान विद्या विभाग सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कापूस संशोधन विभाग लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग सोयाबीन प्रक्षेत्र ज्वारी संशोधन विभाग धान्य संशोधन विभाग तेलबिया संशोधन विभाग कोरडवाहू संशोधन विभाग यासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी बंधू-भगिनींची गर्दी झालेली पाहून विद्यापीठातील सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला होता.

उद्या दिनांक 22 सप्टेंबर रोजी शिवार फेरीचा समारोप होणार असून महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती संगीता अढाऊ, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचे सह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहें. अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीचा लाभ घ्यावा अशी विनंती संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केली आहे.

चर्चासत्र कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी तेलबिया , कडधान्य औषधी व सुगंधी वनस्पती रोगशास्त्र तसेच कृषी अभियांत्रिकी विषयक प्रश्न विचारले. यावेळी विद्यापीठातील संबंधित विषयाच्या शास्त्रज्ञांनी त्यांची समर्पक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.शिवार फेरीचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, यांचे सह विद्यापीठातील सर्वच वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: