झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमात अंकिताला जिवंत जाळले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असून हिंदू संघटना रस्त्यावर उतरत आहेत. दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अंकिताला जिवंत जाळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत ओवेसी यांनी सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन केले पाहिजे, असे सांगितले. तरूणाने तरुणीला जिवंत जाळल्याची घटना ‘हिंसक’ असल्याचे ओवेसी म्हणाले.
एआयएमआयएम प्रमुखांनी मीडियाला सांगितले की, “मी या घटनेचा केवळ निषेधच करत नाही, तर झारखंड सरकारने या प्रकरणावर कठोरपणे कारवाई करण्याची मागणीही करतो. शक्य असल्यास या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करावे. आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे.
झारखंडमधील दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी एकतर्फी प्रेम प्रकरणातील आरोपी शाहरुखने अंकिताच्या खोलीत खिडकीतून पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. ही घटना घडली त्यावेळी मुलगी तिच्या खोलीत झोपली होती. गंभीररित्या भाजलेल्या या मुलीला रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये चांगल्या उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी शाहरुखला अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी शाहरुख पोलीस कोठडीत आहे. तर कालच अंकिता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.