रामटेक – राजु कापसे
रामटेक – विभागीय वनाधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण नागपूर, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर तथा डब्ल्यू.डब्ल्यू.एफ. संस्था यांचे संयुक्त विद्यमाने निसर्ग पर्यटन संकुल सिल्लारी येथे ३ जून ते ५ जून दरम्यान तीन दिवसीय उन्हाळी निसर्गानुभव शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी द्वारा संचालित राष्ट्रीय हरित सेनेच्या ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या तीन दिवसीय कार्यशाळेत जंगल सफारी, वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरी, सजीवांची अन्नसाखळी, जैवविविधतेचे वर्गीकरण, वन्यजीव मूर्तिकला, डार्क स्काय निरीक्षण, स्वच्छता अभियान, जलद बचाव दल कार्यपद्धती’ अशा विविध उपक्रमांतून हरित सेनेच्या निसर्गदुतांनी निसर्ग अनुभव घेतले.
निसर्ग अनुभवासोबत उपस्थित व वन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ घेतला यात अजिंक्य भटकर यांनी वन्यजीवांचे महत्त्व आणि त्यांच्या बद्दल विस्तृत असे मार्गदर्शन मुलांना केले. अभिजीत ईलीमकर यांनी पेंच आणि व्यवस्थापन बद्दल माहिती दिली. संदीप क्षीरसागर यांनी मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व व विद्यार्थ्यांची त्यामधील भूमिका यावर मार्गदर्शन केले. श्रीकांत ढोबळे यांनी पेंचमधील घुबडांबाबत माहिती दिली. नरेंद्र चांदेवार यांनी जंगलातील वृक्षांची माहिती अतिशय मनोरंजकपणे विद्यार्थ्यांना दिली.
विशाल सोरते यांनी मुलांना शाडू माती पासून प्राणी व कागदापासून मास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले. जयेश तायडे यांनी जलद बचाव दलाचे कार्य समजाऊन सांगितले. आकाश झाकल यांनी श्वान पथकाबद्दल माहिती दिली. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिल्लारी येथे विद्यार्थी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
शिबिराचे संयोजन मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, डब्लूडब्लूएफ इंडिया), मुख्य मार्गदर्शन संदीप क्षीरसागर (विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण) नागपूर, नरेंद्र चांदेवार (विभागीय वनाधिकारी) नागपूर, श्रीकांत ढोबळे (सिबा), विशाल सोरते, चंद्रकांत निमन, प्रकाश तडस (सहायक वनसंरक्षक सा.व.), वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके (सामा. वनी) पारशिवनी, अभिजीत इलमकर (पूर्वपेंच, सिल्लारी), जयेश तायडे पवनी (वन्यजीव), शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सर्वश्री भगवान मारबते, दत्ता भार्गवे, प्रवीण साठवणे, प्रशांत हूमने हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभू नाथ शुक्ल (क्षेत्रसंचालक) नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. वनपाल विजय येरपुडे पारशिवनी, संजय पर्रेकर सिल्लारी, मनोहर शेंडे, प्रा. सुनील वरठी, अर्चना कडबे, करीना धोटे यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतात स्पष्ट केले की, “जंगल सफारी दरम्यान वाघ, बिबट, रानकुत्रा, नीलघोडा, गवा अशा विविध वन्यप्राण्यांचे दर्शन, त्यांच्या दैनंदिन सवयी व जीवनपरिचयाद्वारे जंगल क्षेत्राबाबतचे आकर्षण वृद्धिंगत झाले व जंगलाचा हा अनुभव अत्यंत रोमांचदायक ठरला.”
”सहभागी विद्यार्थी पेंचच्या बफर क्षेत्रातील असून देखील जे अनुभव त्यांना आजपर्यंत प्राप्त झाले नव्हते. त्या प्रत्यक्ष अनुभवाने विद्यार्थ्यांची जिज्ञासापूर्ती होऊन भविष्यकालीन निसर्ग सुरक्षिततेसाठी आवश्यक अशी तरुण नागरिकांची पिढी तयार होण्याची दृष्टीने हे निसर्ग शिबीर अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.” असे मत वनविभागाचेआभार मानतांना पर्यावरण प्रेमी शिक्षक साक्षोधन कडबे यांनी व्यक्त केले.