किड्स पॅराडाईजचा अभिनव उपक्रम
पातूर – निशांत गवई
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच आधुनिक शेतीचे धडे गिरवण्याचा उपक्रम पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलने सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला पातुरच्या भाजी बाजारात दाखल झाला आहे. शेती व्यवसायासोबतच मार्केटिंगचे धडे गिरवण्याचा प्रयत्न कौतुकाचा विषय ठरला आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे गरजेचे आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमातच जर आधुनिक शेतीचे धडे गिरवले गेले तर शेतकरी समृद्ध होईल. व आपल्या देशात भविष्यात प्रगतिशील शेतकरी तयार होतील.
या उद्देशाने किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आखण्यात आला. इयत्ता सहावी पासून विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे शाळेत गिरवले जात आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना माती परीक्षण, फळशेती फुलशेती आधुनिक शेती याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाते. यानुसार विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला नुकताच पातुरच्या भाजी बाजारात विक्रीसाठी आणला. शेतात पिकवलेल्या मालाची बाजारपेठेत कशी विक्री करावी याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या उपक्रमासाठी वंदना पोहरे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सेंद्रिय भाजीपाल्याच्या स्टॉलला पातुरचे गटशिक्षणाधिकारी उल्हास घुले , शिक्षण विभागाचे अमोल तायडे, सामाजिक कार्यकर्ते बंटी गहीलोत, राजेश आवटे, मोहन गाडगे,, बाळूभाऊ गाडगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले.