Monday, November 18, 2024
Homeविविधअसाही एक डिजिटल दिवाळी अंक…

असाही एक डिजिटल दिवाळी अंक…

दिवाळी…दिव्यांचा व प्रकाशाचा सण! दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण पृथ्वीतलावर प्रकाशाचा अभिषेक करून सर्वांच्या आयुष्यात उजेड पेरणारा भारतीयांचा सर्वात मोठा सण!
अशा दिवाळीत भर पडली ती ज्ञानाच्या प्रकाशाची. सुमारे ११७ वर्षांपासून तेजोमय ज्ञानाचा प्रकाश आपणास दिवाळी अंकांच्या रूपाने अनुभवायास मिळत आहे.

१९०५ मध्ये बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या ‘मित्रोदय’ मासिकाने दिवाळी प्रित्यर्थ पहिला-वहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला. दिवाळी फराळासोबतच तद्नंतर अनेक दिवाळी अंकांनी वैविध्यपूर्ण असा साहित्यिक फराळ देऊन वाचकांची क्षुधा शांती करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रकाशित होतात.अनेक लिहित्या हातांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करून त्यांना अशा दिवाळी अंकांचे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून रसिक वाचकांच्या अभिरुचिवर संस्कार करण्याचे काम दिवाळी अंकामार्फत होत असते.

जसजसा काळ बदलत गेला तसतसे दिवाळी अंकाचे स्वरूपही बदलत गेले. कालपरत्वे प्रत्येकवर्षी दिवाळी अंकामध्ये नाविन्यपूर्ण असे अनेक प्रयोग आणि बदल होत गेले. छापील स्वरूपातील अंकांना डिजिटल स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे उत्कृष्ठ आणि दर्जेदार प्रतीची साहित्यसंपदा जणू जगभरातील लोकांच्या तळहातावर उपलब्ध झाली आहे. या डिजिटल अंकात ऑडियो आणि व्हिडीओ स्वरूपातील दिवाळी अंकासारखे लक्षणीय प्रयोग करण्यात आले.

पहिला डिजिटल स्वरूपातील दिवाळी अंक सन २००० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर वाचकांची सोय आणि अंकाचा दर्जा लक्षात घेता ई-रीडर माध्यमांसाठी दिवाळी अंक तयार केला गेला.
डिजिटल दिवाळी अंकातही छापील अंकाप्रमाणेच अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. असाच परंतु इतरांपेक्षा पूर्णतः भिन्न स्वरूपाचा दिवाळी अंक म्हणजे ‘जाणीव’ डिजिटल अंक! केवळ आणि केवळ कविता, लेख आणि इतर साहित्य प्रकारांनी समृद्ध असलेल्या या दिवाळी अंकात जाहिरातींचे प्रायोजकत्व शोधूनही सापडणार नाहीत; म्हणूनच या अंकाने साहित्यिकांच्या मनामनात घर केले आहे आणि म्हणूनच हा डिजिटल दिवाळी अंक इतर अंकापेक्षा पूर्णतः विभिन्न आहे.

सध्या फेसबुकवर अनेक साहित्य समुहांची निर्मिती झालेली आहे. परंतु स्वतःचे वेगळेपण जपत “कविता : तुझी आणि माझी!” या एकमेवाद्वितीय समूहाने ‘जाणीव’ या डिजिटल दिवाळी अंकाचे सलग दुसऱ्या वर्षी दिमाखदार प्रकाशन केले आहे. फेसबुक समूहा मार्फत डिजिटल दिवाळी अंक काढण्याचा हा अभूतपूर्व आणि अगदीच वेगळा प्रयत्न या समूहाने केला आहे. मराठी काव्य साहित्याचे संवर्धन करण्यासाठी अनेक नवोदित कवी आणि कवयित्री यांना प्रेरित करून त्यांच्यातील सुप्त प्रतिभासंपन्नतेला एक नितांतसुंदर व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘जाणीव’ या डिजिटल दिवाळी अंकाने केले आहे.

या फेसबुक समूहाचा हा रसपूर्ण, सारगर्भित, विलोभनीय शब्दरूपी रत्नांनी जडलेला सर्वांगसुंदर असा डिजिटल अंक अगदी सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेत आहे. दर्जेदार सर्वसमावेशक साहित्यप्रकार आणि वैविध्यतेने बहरलेल्या या ‘जाणीव’ दिवाळी अंकाने दिवाळीत वाचनानंदाची भर घालून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे.”कविता : तुझी आणि माझी!” हा फेसबुक समूह म्हणजे नवोदित, उदयोन्मुख कवी आणि कवयित्री यांपासून ते अगदी महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात आणि नामवंत साहित्यिक या सर्वांच्या अभिव्यक्तीसाठी खुले असलेले काव्यप्रेमी रसिकप्रिय डिजिटल व्यासपीठ आहे.

अनेक मान्यवर कवी, कवयित्री आणि लेखक यांच्या कविता, गझल, लेख, हायकू आदी साहित्य प्रकार आपणास या ‘जाणीव’ अंकात वाचता येतील.”कविता : तुझी आणि माझी!” या फेसबुक समूहाची स्थापना ८ जून २०२० साली कविवर्य श्री. ज्ञानेश सूर्यवंशी यांनी केली. ज्ञानेशजी यांच्या आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक चारोळ्या,२०० च्या जवळपास स्वरचित कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा ‘संवेदना’ हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

पुणे आकाशवाणी केंद्रावरून आणि दुरदर्शनवरून त्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केलेले आहे. काही स्वरचित गाण्यांचा अल्बम प्रकाशनाच्या वाटेवर असून त्यापैकी काही श्रवणीय गाणी रेकॉर्ड झालेली आहेत.समूह संस्थापक ज्ञानेशजी यांनी समूहाबद्दल माहिती देताना सांगितले की, लवकरच म्हणजे येत्या नवीन वर्षात जानेवारी २०२३ मध्ये राज्यस्तरीय काव्य महोत्सव आणि काव्यसम्मेलनाचे आयोजन पांचगणी या थंड हवेच्या निसर्गरम्य परिसरात केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक नवोदित साहित्यिक आणि अनेक नामवंत, प्रथितयश साहित्यिक अशा सर्वांनाच या काव्य महोत्सवाची उत्सुकता असून सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वांना अधिकाधिक संख्येने यात सहभागी करून घेण्याचा मनोदय समुहाच्या प्रशासकीय मंडळाने व्यक्त केला आहे.

सर्वांसाठी खुले असलेले हे काव्य महोत्सव आणि कवी संमेलन ऐतिहासिक ठरेल. सदर संमेलनामध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत असेल. एकूणच मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांच्या संवर्धनासाठी येणारा प्रत्येक दिवस आशादायक आणि दैदिप्यमान असेल यात यत्किंचितही शंका नाही.

छाया सीमा खंडागळे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: