- महिला व बाल कल्याण कार्यालयापुढे केले एकदिवसीय आंदोलन
- महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यापुढे व्यक्त केला संताप
- आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकांनी वाचला समस्यांचा पाढा
- समस्या मार्गी लावण्यास शाशन – प्रशाषण उदासीन
- तब्बल ९ महिन्यांपासुन इंधन खर्च थकीत
- तुटपुंज्या मानधनातुन महिनोनीमहीने इंधन खर्च कसा चालवावा
रामटेक – राजु कापसे
तुटपुंज्या मानधनात कसाबसा संसारगाडा हाकणाऱ्या अंगणवाडी सेविकांपुढे सध्यास्थितीत विविध समस्या आ वासुन उभ्या ठाकल्या आहेत. यातील प्रमुख समस्या चिमुकल्यांसाठी पोषण आहार शिजविण्याकरीता लागणार्या इंधनाची असुन गेल्या नऊ महिन्यांपासुन शाशनाकडून अंगणवाडींना इंधन खर्च दिला गेला नसुन तो थकीत असल्यामुळे तुटपुंज्या मानधनात इंधन खर्च कसा उचलावा असा बिकट प्रश्न अंगणवाडी सेविकांपुढे उभा ठाकला आहे.
अंगणवाडीसेविकांच्या यासारख्या अनेक समस्या जैसे थे च्या स्वरूपात अद्यापही कायम असुन सरतेशेवटी सहनशिलतेचा बांध फुटल्यामुळे आज दि. २८ फेब्रुवारीला अंगणवाडीसेविकांसह मदतनिसांनी थेट आंदोलनाचा पावित्रा घेत स्थानीक महीला व बाल कल्याण कार्यालयापुढे शाशन – प्रशाषणाविरोधात नारेबाजी करीत एकदिवसीय आंदोलन केले व मागण्या पुर्ण होईपर्यंत अंगणवाडीच्या चाव्या देण्यास साफ नकार दिला.
याबाबद आंदोलनातील अंगणवाडी सेविकांची संवाद साधला असता त्यांनी प्रतिनिधीपुढे समस्यांचा जणु पाढाच वाचला. त्यानुसार इंधन बिलाबद्दल सांगायचे झाल्यास जून २०२२ पासून अंगणवाडीतील मुलांना शाशनाकडुन पोषण आहार सुरू करण्यात आलेला आहे. आहार शिजविण्यासाठी लागणारे इंधन म्हणजेच सिलेंडर अंगणवाडी सेविका आपल्या स्वखर्चाने करीत आहे.
सध्यास्थितीत तालुक्यातील ५० % अंगणवाडीतील सिलेंडर संपलेले आहे तेव्हा आता सिलेंडर कसे भरावे व पोषण आहार कसा शिजवावा हा गंभीर प्रश्न अंगणवाडी सेविकांसमोर उभा आहे कारण गेल्या नऊ महिन्याचा इंधन खर्च शासनाने अजूनही अंगणवाडी सेविकांना दिलेला नसुन तो थकीत आहे. तुटपुंजे आणि वेळेवर न मिळणारे मानधन त्यामध्ये सेविकांनी आपला घर खर्च सांभाळावा की पोषण आहार शिजवण्यासाठी सिलेंडर भरावे असा आंदोलनाप्रसंगी सवाल करण्यात आला.
तसेच अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन लागु करण्यात यावे तसेच सी.बी.ई. चे कार्यक्रम अंगणवाडीमध्ये सेविकांकडुन घेतल्या जाते त्यासाठी लागणारा खर्च अंगणवाडी सेविका स्वतः जवळूनच करीत असतात. मात्र यासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे केव्हा मिळतील अशी विचारणा पर्यवेक्षीकेला केल्यास ‘ तुमचे पैसे येतील ‘ असे निव्वळ आश्वासन आम्हाला मिळते परंतु ते सुद्धा आम्हाला नियमित मिळत नाही त्यासाठी सीबीइचे कार्यक्रमाचे पैसे आधी द्यावे आणि नंतर कार्यक्रम घेण्यास सांगावे अशी सेविकांची मागणी आहे.
त्याचप्रमाणे शासनाकडून सेविकांना दरवर्षी युनिफॉर्म पुरविण्यात येतो परंतु तेही पैसे ठरलेल्या वेळी येत नाही व उल्लेखनिय म्हणजे युनिफॉर्मसाठी आलेले पैसे कसे परत जातात हे आमच्या समजन्यापलीकडचे कोडे आहे असेही सेविका म्हणाल्या. त्यापेक्षा रक्कम जमा न करता शासनातर्फे युनिफॉर्म का पुरविण्यात येऊ नये असा सवालच त्यांनी आंदोलनादरम्यान केलेला आहे. टी.ए. बिला विषयी सांगतांना सेवीका म्हणाल्या की सभेला जाताना स्वखर्चाने जावे लागते मग ती सभा कोणत्याही गावी असो परंतु प्रवास भाडे पाच पाच वर्ष मिळत नाही म्हणून प्रवास भाड्याची रक्कम प्रत्येक वर्षाला देण्यात यावे. तसेच इतर सर्व शाळांप्रमाणे अंगणवाडीला उन्हाळी सुट्या निदान महिन्याच्या तरी देण्यात याव्या.
तसेच अंगणवाडी सेविका दीर्घ आजारी पडल्यास तिचे मानधन कपात करण्यात येते आधीच सेविकेचे तुटपुंजे मानधन आणि त्यातूनही मानधन कपात करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल करीत जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अंगणवाडीच्या चाव्या देणार नाही असे आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनिस महिलांनी महीला व बाल कल्यान अधिकारी माया पाटील यांना खडसावले.
तर अशा आहेत मागण्या
- अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन लागु करा व ते नियमीत द्या
- वैद्यकीय रजा लागु करा
- जिल्हा परीषद शाळेप्रमाणे उन्हाळी सुट्या लागु करा
- अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पेंशन लागु करा
- इंधन बिलाचे दर वाढवुन द्या
- थकीत असलेले ९ महीन्यांचे इंधन बिल त्वरीत काढा
- मोबाईल परत करण्यापुर्वीचा रिचार्ज खर्च त्वरीत काढा
- अंगणवाडी सेविकांची पदोन्नती सेवा पर्यवेक्षीकेच्या पदाकरीता जेष्ठता यादीनुसार द्या अंगणवाडी सेविकांच्या यासर्व समस्यांबाबद स्थानीक महिला व बाल कल्याण येथील महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी माया पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अंगणवाडीसाठी लागणारा इंधन खर्च निधी शाशनाकडून आलेला नाही, आल्यावर वितरीत करू. काही गोष्टी आमच्या हातात नसतात तरीही आम्ही अंगणवाडी सेविका तथा मदतनिस यांच्या समस्या डेप्टी सिईओ यांचेकडे पाठविल्या आहेत. मार्च अखेरीस निधी येईल त्यातुन थकीत असलेले मोबाईल रिचार्ज चे पैसे देण्यात येईल. असे सांगत माया पाटील यांनी ‘ अंगणवाडी ही पर्सनल प्रॉपर्टी नाही, बालकांच्या कुपोषणात वाढ होऊ नये यासाठी अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीच्या चाव्या जमा कराव्यात असे महीला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी माया पाटील यांनी अंगणवाडी सेविकांना सांगीतले.