सांगली – ज्योती मोरे
विट्यातील कराड नाक्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि विटा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहा किलो गांजासह अटक करण्यात आले आहे. आज विटा भागात अवैध धंद्यांबाबत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गोरख पवार राहणार वडोली निळेश्वर ग्रामपंचायत जवळ,
तालुका कराड, जिल्हा सातारा या इसमास निळसर रंगाच्या वॅग्नर गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी विट्यातील नेवरी नाक्यावर आला असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विटा पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत त्यास दहा किलो गांजा सह ताब्यात घेतले आहे.
सदर गांजाची किंमत दोन लाख रुपये इतकी असून, तो गाडीतील डिकीत पांढऱ्या रंगाच्या गोणीत, निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत खाकी रंगाच्या चिकट टेपने गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान गांजा सह गुन्ह्यात वापरलेली सुमारे अडीच लाख रुपये इतकी किमतीची एम एच ०२ बी वाय 40 86 या क्रमांकाची वगनर गाडी, असा एकूण चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमालासह आरोपीस विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार अच्युत सूर्यवंशी, संदीप गुरव, अमोल ऐदाळे, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, विटा पोलीस ठाण्याचे अंमलदार आदींनी केली.