मुंबई – गणेश तळेकर
ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकसत्ता’चे माजी संपादक विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘शंभर नंबरी अण्णा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात विद्याधर गोखले यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येणार आहे.
विद्याधर गोखले त्यांच्या कुटुंबात, मित्र परिवारात, त्यांच्या सहवासात आलेल्या हजारो लोकांमध्ये अण्णा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा दृक-श्राव्य कार्यक्रम गुरुवार, दि. १८ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे यांच्या संकल्पनेतून हा जीवनपट साकारला आहे. गोखले यांच्या चाहत्यांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी केले.
विद्याधर गोखले यांच्या अग्रलेखांचे वाचन, त्यांचे किस्से, त्यांच्या कविता, त्यांच्या संगीत नाटकातील गाणी असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी, विघ्नेश जोशी, प्रमोद बापट, ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, ओंकार प्रभूघाटे या कलाकारांसह ज्येष्ठ संपादक आणि पत्रकारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
ते पत्रकार, नाटककार, उत्तम वक्ता, लेखक, संगीत नाटक निर्माता होते. उर्दू शेरो शायरीवर त्यांची हुकुमत होती. विविध भूमिका साकारून त्यांनी मराठी मनाला मंत्रमुग्ध केले. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग लोकप्रियता संपादन केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे चाहते होते, मित्र होते. लोकसत्तेतील अग्रलेखांनी ते प्रभावित झाले होते. म्हणूनच त्यांनी गोखले यांना लोकसभेचे तिकीट दिले आणि ते निवडणुकीला उभे राहिले, खासदारही झाले.